उंबरठ्यावर येवून ठेपलेला सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी विविध कामांकरिता एकेक पैशांची वाट पाहणाऱ्या जिल्हा प्रशासनास दिलासा मिळेल असा निर्णय केंद्राने घेतला असून कुंभमेळ्यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
इतर अतिरिक्त केंद्रीय मदतीअंतर्गत वित्त मंत्रालयाने हा निधी मंजूर केला असून खा. हेमंत गोडसे यांनी त्यासंदर्भातील माहिती दिली आहे. सिंहस्थासाठी करावयाची अनेक कामे निधीअभावी संथपणे सुरू आहेत. शहरातील काही ठिकाणी रस्ता दुरूस्तींची कामे करण्यात आली असली तरी अद्याप गोदावरीवरील पुलांच्या दुरूस्तीची कामे बाकी आहेत. उदाहरणार्थ दहीपुलाच्या पंचवटीकडील बाजूचे काँक्रिटीकरण पूर्णत्वाकडे आले असले तरी पुलावर काही वर्षांपासून पडलेले खड्डे कायम आहेत. सिंहस्थात या पुलावरून भाविकांची मोटय़ा प्रमाणावर होणारी वाहतूक लक्षात घेता या पुलाची दुरूस्ती त्वरीत हाती घेणे आवश्यक आहे. याशिवाय इतरही अनेक कामे सुरू आहेत. केंद्राकडे वारंवार निधीची मागणी करण्यात येत होती. वित्त मंत्रालयाने देशभरातील प्रमुख सहा टिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी ४५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून त्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी १०० कोटींची तरतूद आहे.
निती आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला असला तरी यापुढे पाच वर्षांत होणाऱ्या कोणत्याही मोठय़ा उत्सवासाठी निधी देण्यात येणार नाही, अशी अट टाकण्यात आली आहे. या निधीचा उपयोग विविध विकास कामांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात यावा. त्यात पथदीप, वाहतूक, आरोग्य, अग्निशमन, पाणीपुरवठा या व्यवस्थांचा समावेश आहे. प्रसासनाच्या सुविधेसाठी वाहन खरेदी, कार्यालयांची दुरूस्ती, फर्निचर खरेदी आदी कामांसाठी करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader