डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्र सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री असताना त्यांनी जी धोरणे आखली होती, त्या धोरणांची अंमलबजावणी आताचे केंद्र सरकार करत असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली.
भारतीय अन्न महामंडळाच्या नागपूर कार्यालय परिसरात उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम भारत अन्न महामंडळाचे कार्यकारी निदेशक ए.के. भट्टाचार्य होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, अन्न महामंडळाच्या क्षेत्रिय कार्यालयाचे महाव्यवस्थापक डी.आर. परमेश, नागपूरचे सह-महाव्यवस्थापक बी.ई.जेसुदासन आणि नागपूरचे विभागीय व्यवस्थापक आर.एन. जनबंधु प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या खात्याचे मंत्री राहिले, त्या खात्याची रुपरेखा त्यांनी आखून ठेवली होती. त्यात वीज, अन्न-धान्याचे वितरण, पाणी पुरवठा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित धोरणांचा समावेश होता. अन्न महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता. अन्न सुरक्षा कायदा हा त्यांच्या धोरणांचाच एक भाग आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख म्हणाले, धान्याची साठवणूक करण्यासाठी राज्यात एकूण ५८४ गोदामे आहेत. यामध्ये ५.५० लाख मेट्रिक टन धान्य ठेवण्याची क्षमता आहे. त्यात दोन हजार कोटी रुपये खर्चाचे व १३.५० लाख मेट्रिक टन धान्य ठेवण्याची क्षमता असणारे नवीन ६११ गोदामाचे बांधकाम सुरू असून त्यातील ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहेत. हे बांधकाम पूर्ण झाले की एकूण १९ लाख टन अन्नाची साठवणूक होणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी अन्न महामंडळातर्फे शरद पवार आणि अनिल देशमुख यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा निर्माण करणारे प्रज्ञा रवी मूर्ती यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ए.के. भट्टाचार्य यांनी स्वागतपर भाषणात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून अन्न महामंडळाच्या कार्याची भूमिका विशद केली. आर.एन. जनबंधू यांनी प्रास्ताविक केले. अशोक जांभुळकर यांनी संचालन तर राहुल सत्रमवार यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील, माजी शहराध्यक्ष दिलीप पनकुले, प्रकाश गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.