सिग्नल यंत्रणेत बदल केल्याची कोणतीही पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाने मोटारमनला दिली नव्हती. त्याचबरोबर मेगा ब्लॉक दरम्यान घेण्यात आलेले निर्णय रेल्वेचे व्यवस्थापकीय कायदे धाब्यावर बसवून घेण्यात आल्याचा आरोप मोटारमन संघटनेने केला आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बदल करीत असताना संबधित विभागाला त्यासंदर्भात सूचना देणे आवश्यक असते. त्याचबरोबर त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करून घेणे रेल्वे व्यवस्थापकीय कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण यातील कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी रेल्वे प्रशासनाने केली नसल्याचा आरोप रेल कामगार सेनेचे चिटणीस जयंत निमसूडकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर बदलण्यात आलेल्या सिग्नलची माहिती एका साध्या कागदावर फक्त काही तास अगोदर मोटारमनना देण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय कागदाच्या अधारावर गाडय़ा कशा चालवायच्या, असा सवालही निमसूडकर यांनी केला आहे. पण यासंदर्भात कुठल्याही सूचना सबंधित आधिकाऱ्यांना देणे बंधनकारक नसल्याचे रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले.

Story img Loader