मुंबईला जाण्यासाठी जेव्हा गर्दीचा महापूर लोटतो, नेमक्या त्याच वेळेस बुधवारी सकाळी ८.३० वाजता दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक एक-दोन तास ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानके गर्दीने ओसंडून वाहत होती. कार्यालय गाठण्यासाठी प्रवाशांनी नवी मुंबई, ठाणे येथे जाणाऱ्या बसगाडय़ांचा आधार घेतला. मेरू टॅक्सींची वर्दळही वाढली होती.
रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहून अनेक प्रवाशांनी घरचा रस्ता धरला. कल्याण, टिटवाळा, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली रेल्वे स्थानके प्रवाशांनी गजबजून गेली होती. कामाला जाण्याच्या वेळेतच ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. कल्याण, डोंबिवलीतील अनेक प्रवाशांनी केडीएमटी, नवी मुंबई परिवहन उपक्रम, एस. टी., खासगी वाहनांचा आधार घेऊन शिळफाटा, भिवंडी बायपासमार्गे मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला.
चाकरमानी, त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी, फेरीवाले, मालवाहू विक्रेते अशा सगळ्यांचा एकाच वेळी खोळंबा झाल्याचे दृश्य रेल्वे स्थानकांवर दिसत होते.
सकाळी विस्कळीत झालेली लोकल सेवा नंतरही २० मिनिटे उशिराने धावत होती. कल्याण, डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील हवालदार मात्र दिव्याला काहीतरी झाले आहे, एवढीच माहिती देऊन तुम्ही ठाणे, भायखळा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधा अशी उत्तरे देत होते. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तर ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचा दूरध्वनी नसल्याची माहिती तेथील उपस्थित हवालदाराने दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा