कळमनुरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवणी (खुर्द) येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. केंद्र उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची व परिस्थितीची केंद्रीय राखीव दलाचे महासंचालक के. पी. सिंग यांनी नुकतीच पाहणी केली. त्यांच्यासोबत कळमनुरीचे आमदार राजीव सातव होते.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार राजीव सातव यांच्या प्रयत्नामुळे कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे सशस्त्र सीमा दलाची उभारणी होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यास तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी येलकी शिवारातील ७७ एकर जमीन सीमा दलाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जमिनीचा मावेजा राज्य सरकारकडे जमा करण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा दलाची उभारणी प्रक्रिया पूर्ण होते न होते तोच आमदार सातव यांनी शिवणी खुर्द येथे शासकीय गायरान जमिनीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले होते.
त्या धर्तीवर केंद्रीय गृहमंत्रालयातून या भागात हे केंद्र उभारणी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. गृहमंत्रालयाकडून त्याला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. महसूल विभागानेसुद्धा त्यांच्या ताब्यातील गायरान जमिनीची कागदपत्रे, नकाशे आदींची पूर्वतयारी ठेवली होती.
केंद्रीय राखीव दलाचे महासंचालक के. पी. सिंग यांनी चार दिवसांपूर्वी कळमनुरीला भेट दिली व शिवणी (खुर्द) येथील प्रशिक्षण केंद्रासाठीच्या प्रस्तावित ७० एकर जमिनीची पाहणी केली. या वेळी हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी गायरान जमिनीसोबतच प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक असलेली माहिती दिली.