राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या मुंबईतील सुरू असलेल्या गिरण्या विदर्भामध्ये हलविण्याचा घाट राज्य सरकार घालत असून त्याविरोधात गिरणगावात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता परळच्या कामगार मैदानावर निदर्शने आणि कामगार लाक्षणिक साखळी उपोषणास बसणार आहेत.
राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या सुरू असलेल्या टाटा, पोदार, इंडिया न्यू मिल नं. ५, तसेच संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या न्यू सिटी, इंदू नं. १, गोल्डमोहर व अपोलो या गिरण्या विदर्भात नेऊन चालविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जेथे कापूस पिकतो, तेथे या गिरण्या सुस्थितीत चालतील, असा मुद्दा पुढे करून त्या विदर्भामध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीपासून कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले असून मुंबईतून गिरण्या हद्दपार करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रीय मिल मजदूर संघाकडून करण्यात आला आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली कामगार मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.

Story img Loader