ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी उघडलेल्या मोहीमेनंतर काही काळ दबा धरून बसलेले सोनसाखळी चोर शहरात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या परिसरात सुमारे पाच महिलांचे दागिने चोरीला गेल्यामुळे महिला वर्गात काहीसे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या गर्दीच्या ठिकाणी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरटय़ांनी पलायन केले. पाचपाखाडी भागात अशा प्रकारच्या घटना घडू लागल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे सोनसाखळी चोरांची मोठी टोळी शहरात सक्रिय झाली होती. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे पोलीस टीकेचे धनी ठरले होते. त्यामुळे या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आयुक्त रघुवंशी यांना स्वत: मैदानात उतरावे लागले होते. या काळात पोलिसांनी नाकाबंदी तसेच वाहनांची तपासणी अशासारख्या मोहिमा हाती घेतल्या. त्यानंतर संपूर्ण आयुक्तालय परिसरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ हाती घेण्यात आले. या मोहिमेसाठी पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी स्वत: रस्त्यावर उतरले होते. या मोहिमेत काही सोनसाखळी चोरटय़ांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात अट्टल मानली जाणाऱ्या इराणी टोळीलाही ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने जेरबंद केले होते. त्यामुळे या चोरटय़ांचा उपद्रव काहीसा कमी झाल्याचे चित्र होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय होऊ लागले असून सकाळच्या वेळेत फिरायला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. ठाणे शहरात रहाणाऱ्या विठ्ठल महादेव जोशी (७९) आणि त्यांची पत्नी सकाळच्या वेळेत फिरायला निघाल्या असताना चोरटय़ांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेली. अशाच घटना पाचपाखाडी भागात शीतल कोरपे, नीलम सावंत आणि संगीता मसूर या महिलांच्या सोबतही घडले. नुरीबाबा दर्गा रोड, न्यू इंग्लिश स्कूल आणि अष्टविनायक चौक आदी भागांत अशा प्रकारचे गुन्हे घडले असून या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घरफोडेही सक्रिय..
दरम्यान, सोनसाखळी चोरांसोबत घरफोडीच्या घटनांमध्येही वाढ झाली असून मुंब्रा भागात या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या आठ दिवसांत मुंब्रा परिसरात चार ते पाच घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. मुंब्रा भागात रहाणारे प्रद्युत जाना यांच्या घरात कुटूंबीय झोपलेले असतानाही खिडकीवाटे प्रवेश करून चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. दिवा पूर्व भागात कल्पना देवकुळे या कामावर गेल्या होत्या. त्यावेळी घरात एकटीच असलेली त्यांची आई कुलूप लावून पाणी आले का, पाहण्यासाठी इमारतीखाली गेली होती. याच संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी सुमारे ९६ हजारांचा ऐवज लुटून नेला. मुंब्रा येथील अमृतनगर भागात रहाणारे मुस्तफा पटवे आणि त्यांची पत्नी कामावर गेली होती. त्यावेळी चोरटय़ांनी घराचा कडीकोयंडा तोडून ९९ हजारांचा ऐवज लुटून नेला. या घटनांवरून कुलूप असलेल्या बंद घरांना चोरटय़ांकडून लक्ष्य केले जात असल्याचे उघड झाले आहे.

Story img Loader