मुंब्रा भागातून दोन जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने अटक केली असून त्यातील एक आरोपी ठाणे पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे वादग्रस्त ठरलेल्या मुंब्रा येथील रशिद कंपाऊंडमध्ये तर दुसरा आरोपी मुंब्रा-कौसा भागात राहत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या दोघांकडून एक पाकीटमारीचा, दोन सोनसाखळी चोरी आणि एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. समीर ऊर्फ शमू अहमद शेख (२४, रा. रशिद कंपाऊंड, मुंब्रा) आणि इरफान अब्बास मुलानी (३२, रा. मुंब्रा-कौसा) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश गव्हाणे यांच्या पथकाने श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका पाकीटमारीच्या गुन्ह्य़ामध्ये या दोघांना मुंब्रा भागातून नुकतीच अटक केली होती. त्यांच्याकडून पाच हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. पोलीस तपासामध्ये त्यांच्याकडून कापूरबावडी आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कापूरबावडीच्या गुन्ह्य़ातील १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी तर कासारवडवलीच्या गुन्ह्य़ातील २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून मुंब्रा पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून ही मोटारसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.