बडय़ा शहरातील सोनसाखळी चोरांनी आता महागडय़ा मोबाइलवर हात साफ करण्याचे तंत्र अवलंबिले असून नवी मुंबईतील महापे, खैरणे, तुर्भे, रबाळे, एमआयडीसीत संध्याकाळच्या वेळेत मोबाइलवर बोलत रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या हातातून मोबाइल खेचून परांगदा होणारी टोळी कार्यरत झाली आहे. हातातील मोबाइल खेचण्याइतपत चोऱ्या करणाऱ्या या टोळीने आता अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याचे प्रकारही सुरू केले आहेत. एमआयडीसी भागात ही कृत्ये करणाऱ्या एकाही टोळीचा छडा पोलिसांना अद्याप न लागल्याने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यातील मोठय़ा शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. भरघाव मोटारसायकलने जवळ येऊन रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे ही या टोळ्यांची कार्य पद्धती आहे. त्यासाठी सीसी टीव्हीची मात्रा शोधून काढण्यात आली आहे. सायबर सिटीत असे ४५० सीसी कॅमरे बसविण्यात आले आहेत. नवी मुंबईत मध्यंतरी चेन स्नॅचिंगचे हे प्रमाण दिवसाला पाच ते सहा झाले होते. पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्यांचा बंदोबस्त करणाचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारच्या दोन टोळ्यांना बेडय़ा ठोकल्या आहेत. ही टोळी कल्याणमधील आंबिवली गावात राहणारी असून इराणी टोळी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसत असताना आता मोबाइल चोरीाच्या प्रकारात वाढ झाली आहे. रस्त्याने मोबाइलवर बोलत चालणाऱ्या पादचाऱ्याचा मोबाइल खेचून पोबारा करणे अशी ही कार्यप्रणाली या टोळ्यांनी स्वीकारली आहे.
सध्या अॅड्राईड मोबाइलचा जमाना असल्याने अॅपलसारखा एखादा किमती मोबाइल दहा-पंधरा हजार रुपये सहज मिळवून देतो. हे मोबाइल घेणारे विक्रेतेदेखील मोठय़ा प्रमाणात असल्याने मोबाइल चोरटय़ांचा सुळसुळाट झाला आहे. नवी मुंबईतील एमआयडीसी भागात अशा घटनांचे प्रमाण वाढले असून आठवडय़ाला चार ते पाच घटना घडत आहेत. यातील सर्वजण पोलीस तक्रार करीत नसल्याने ही नोंद कमी होत आहे.
एमआयडीसीतील कारखान्यांकडून सुमारे १३०० कोटी रुपयांची मालमत्ताकर व एलबीटी घेणाऱ्या पालिकेने या भागाला नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली आहे. त्यामुळे एमआयडीसीत रस्ते आणि रस्त्यावरील दिव्यांची कमी आहे. मुख्य रस्ते सोडल्यास अंर्तगत रस्त्यांवर रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र पालिकेला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. अशा अंधारातून रात्रीच्या वेळी कामावर येणाऱ्या इंडियन एक्स्प्रेसमधील उदय साटम यांना दोन दिवसांपूर्वी चांगलाच फटका बसला. साटम नेहमीप्रमाणे आपल्या मोटारसायकलवरून रात्रपाळीसाठी येत असताना नऊच्या सुमारास ग्लोबल कंपनीसमोरील गतिरोधकाजवळ त्यांना गाडी हळू केली. त्याचा फायदा घेऊन तीन मोटारसायकल स्वारांनी त्यांना लागलीच अडविले व चाकूचा धाक दाखविला. साटम यांच्याकडील मोबाइल घेऊन हे चोरटे पळून गेले. विशेष म्हणजे त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. विनाक्रमांक तीन स्वारीच्या मोटारसायकलस्वारांना ठिकठिकाणी लागलेल्या तपासणी नाक्यांवरदेखील पोलीस अडवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साटम यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची रीतसर तक्रार केली आहे.
सोनसाखळी चोरांचे आता मोबाइलवर लक्ष
बडय़ा शहरातील सोनसाखळी चोरांनी आता महागडय़ा मोबाइलवर हात साफ करण्याचे तंत्र अवलंबिले असून नवी मुंबईतील महापे, खैरणे, तुर्भे, रबाळे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2015 at 12:43 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chain snatcher now focus on mobile