शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. ‘मॉर्निग वॉक’ने दिवसाची सुरुवात करणेही नागपुरातील महिलांना हल्ली कठीण झाले आहे. केवळ सकाळच नव्हे तर लुटारूंनी चेन स्नॅचिंगसाठी दिवसाचा कुठलाही प्रहर बाकी सोडलेला नाही.
जून २०१४ मध्ये शहरात चेन स्नॅचिंगच्या ३३ घटना घडल्या. त्यापैकी एका घटनेचा तपास लागला. जुलै २०१४ मध्ये २१ घटना घडल्या. त्यापैकी तीन घटनांचा तपास लागला. जुलै २०१३ मध्ये सतरा घटना घडल्या. त्यापैकी एका घटनेचा तपास लागला. १ जानेवारी ते ३१ जुलै २०१३ दरम्यान १२७ घटना घडल्या. त्यापैकी ४८ घटनांचा तपास लागला. १ जानेवारी ते ३१ जुलै २०१४ दरम्यान १८० घटना घडल्या. त्यापैकी ५२ घटनांचा तपास लागला. २००९मध्ये केवळ ३५, एप्रिल २०१०पर्यंत सतरा व एप्रिल २०११पर्यंत केवळ दोन चेन स्नॅचिंगचा तपास लागल्याचे स्पष्ट होते.
शहरात एकाच दिवशी आठ चेन स्नॅचिंगच्या घटना गेल्यावर्षी घडल्या आहेत. यातील अनेक आरोपींची पोलीस दफ्तरी त्यांची नोंद नसल्याने व तसेच ते विविध व्यवसाय करीत असल्याने कुणाला आरोपींची शंकाही येत नाही. दिवसाला एक असे सरासरी चेन स्नॅचिंगचे प्रमाण आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. सकाळी रस्त्यावर विशेष वर्दळ नसते. त्याचा नेमका फायदा हे लुटारू घेतात. मोटारसायकलवर येऊन ‘मॉर्निग वॉक’ करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी अथवा मंगळसूत्र खेचायचे आणि वेगात पळून जायचे, अशी चेन स्नॅचिंगची साधीसुधी मोड्स ऑपरेंडी आहे. त्यातही या लुटारूंनी व्हरायटी आणली आहे. घरासमोर फूल तोडत असलेल्या किंवा फाटकाजवळ उभ्या असलेल्या महिलेला आवाज देऊन थांबवायचे, पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तिच्या गळ्यातील सोनसाखळी अथवा मंगळसूत्र खेचून वेगात पळून जायचे, हा नवा फंडा सध्या हे लुटारू वापरत आहेत. या घटनांनी समस्त महिला वर्गात दहशत निर्माण झाली आहे.
सेवानिवृत्त पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांनी त्यांच्या काळात ही बाब गांभिर्याने घेऊन चेन स्नॅचिंगविरोधी पथक तयार केले होते. आता तर असे पथकच अस्तित्वात नाही. अधूमधून आरोपी सापडतात. मात्र, तरीही या घटना घडतच असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्याआधीच्या पोलीस आयुक्तांनी दिवसातून अनेकवेळा अचानक कुठेही नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अशा घटनांवर अंकुशही लागला होता. सततच्या नाकाबंदीमुळे पोलीसही थकले नि पुन्हा या घटना वाढल्या आहेत.
सध्या सर्वच पोलीस (वाहतूकसह) जागोजागी तपासणी करीत आहेत. विशेषत: किशोर वा तरुण वाहन चालकांना थांबवून त्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत. तरीही चेन स्नॅचिंग थांबलेल्या नाहीत. अनेक गुन्हेगार आता चेन स्नॅचिंगकडे वळले आहेत. स्थानिक गुन्हेगारांच्या विविध टोळ्यांसह परप्रांतीय टोळ्याही यात उतरल्या आहेत.  सरासरी वीस हजाराची सोनसाखळी असली तर बारा ते पंधरा हजार रुपये रोख हातावर पडत असल्याने चेन स्नॅचिंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याची पोलिसांची माहिती आहे. याचमुळे अनेक तरुण मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही चेन स्नॅचिंग करू लागले असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. यामुळे पालक चिंतित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा