आगामी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात नियोजित संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांचे अध्यक्षीय भाषण थोडक्यात होणार असून, संमेलनाच्या समारोपप्रसंगी काकडे आणि हौशी कलावंत यांच्यात ‘मुक्तसंवाद’ रंगणार आहे. त्यातूनच अध्यक्षांचे नाटय़विषयक चिंतन प्रामुख्याने प्रकट होणार आहे. ‘आविष्कार’च्या तालमीत तयार झालेले काही कलाकारही यात सहभागी होणार आहेत. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१४ या काळात पंढरपूर येथे हे नाटय़संमेलन होणार आहे.
नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्षांच्या प्रदीर्घ भाषणाच्या नेहमीच्या परंपरेला छेद देत या वेळी ‘मुक्त संवादा’चा वेगळा प्रयोग केला जाणार आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यात काकडे आपले विचार थोडक्यात व्यक्त करून आपली भूमिका, चिंतन हौशी रंगकर्मींसोबत होणाऱ्या दोन तासांच्या मुक्तसंवादात मांडतील. तसेच दरवर्षी होणाऱ्या परिसंवादाऐवजी मराठी रंगभूमीशी निगडित विविध प्रश्न घेऊन ‘अभिरूप न्यायालय’ साकारण्यात येणार आहे. यात कलावंत, पत्रकार, नाटय़संस्थांचे प्रतिनिधी, प्रेक्षक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तर कांचन सोनटक्के यांच्या ‘नाटय़शाळा’चे बालकलावंत दोन बालनाटय़ेही संमेलनात सादर करणार असल्याची माहिती नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत दिली. नाटय़ संमेलनस्थळाला ‘शं. ना. नवरे नाटय़नगरी’, तर संमेलनस्थळी उभारलेल्या मुख्य व्यासपीठाला ‘विनय आपटे रंगमंच’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच पोलीस हॉल (रखुमाई सभागृह) आणि श्री तनपुरे महाराज मठ येथेही नाटय़ संमेलनातील अन्य कार्यक्रम होणार असून या दोन्ही ठिकाणच्या रंगमंचाला अनुक्रमे सतीश तारे आणि गो. पु. देशपांडे यांची नावे देण्यात आली आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला सुधीर भट यांचे नाव देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून खंडित झालेली ‘नाटय़ दिंडी’ पंढरपूरच्या संमेलनात पहिल्या दिवशी सकाळी होणार असून, मान्यवर कलाकारांसह लोककलावंतांचे लोककला सादरीकरण, मल्लखांब प्रात्यक्षिक यात असणार आहे. नाटय़ संमेलनाच्या माजी अध्यक्षांसाठी खास बग्गीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader