ऊसदराचा प्रश्न अधांतरी राहिल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध मार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पाचवा मल परिसरात आंदोलनकर्त्यां २५ कार्यकर्त्यांना तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. नांद्रे, येळावी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याची िधड काढून दहन केले.
ऊस दराबाबत राज्य शासन कोणतीही ठोस भूमिका जाहीर करू शकत नाही, या संदर्भात केंद्र शासनाने समिती नियुक्त करण्याचा निर्णय म्हणजे वेळकाढूपणा असल्याची भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे यांनी व्यक्त केली. आज दिवसभर तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, बोरगाव, येळावी, आरवडे, मांजर्डे या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मतदार संघात ठिकठिकाणी रस्त्यावर टायरी पेटवून चक्काजाम आंदोलन केले. तासगावला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यावर रास्ता रोको करून वाहतूक रोखली. पाचवा मल येथे आंदोलन करणाऱ्या महेश खराडे यांच्यासह प्रकाश पाटील, शरद शेळके, गुलाब यादव, प्रकाश साळुंखे, किरण जाधव, दत्तात्रय मंगसुळे, प्रशांत चव्हाण, अमोल नलवडे, सोमनाथ गायकवाड आदी २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सांगली बसस्थानकावरून इस्लामपूर, कराड, नांद्रे, वसगडे, तासगाव, कोल्हापूर या मार्गावरील बस वाहतूक थांबविण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाने आपली बस वाहतूक आपल्या जबाबदारीवर सुरू ठेवावी अशा सूचना पोलिसांनी एस.टी. विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे पूर्व भाग वगळता बहुसंख्य मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. कर्नाटकात जाणाऱ्या बसेस मात्र सुरू आहेत. याशिवाय कवठेमहांकाळ, जत, सोलापूर या मार्गावरील बसवाहतूक सुरू असल्याचे मिरज आगारातून सांगण्यात आले.
सांगली-मिरज बसस्थानकावरून तासगाव, विटा, आटपाडी, कडेगाव, कडेपूर, कराड आदी मार्गासाठी बस सुविधा आज बंद करण्यात आल्याने प्रवासी वर्गाची मात्र मोठय़ा प्रमाणात कोंडी झाली आहे. नांद्रे, वसगडे मार्गावर तर गेल्या ६-७ दिवसांपासून शहरी व ग्रामीण बसवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Story img Loader