महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनी एक नोव्हेंबरपासून ‘चला विवेकाचा आवाज बुलंद करू या’ या राज्यव्यापी मोहिमेस वध्र्यात प्रारंभ केला जाणार आहे.
डॉ. दाभोलकर यांनी सातत्याने विवेकी विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य केले होते. समाजातील अनिष्ट व अघोरी प्रथा व रुढींच्या विरोधात सातत्याने प्रबोधन करीत विवेकवादी समाजाच्या रचनेस प्राधान्य दिले. मात्र त्यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येने उभा महाराष्ट्र संतापला. तरुण रस्त्यावर आले. या सर्वाना विवेकाची साद घालून त्यांना अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीत कार्यरत करण्यासाठी, चला विवेकाचा आवाज बुलंद करू या, अशा चळवळीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी भूमिका महाराष्ट्र अनिसचे गजेंद्र सूरकार यांनी स्पष्ट केली. या उपक्रमांतर्गत सभासद नोंदणी सुरू होणार आहे. अधिकाधिक तरुण-तरुणींना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होणार असून इच्छुक अन्य नागरिकही सभासद होऊ शकतात.
संघटनेचे मुखपत्र असणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राचे वर्गणीदारही नोंदविले जाणार आहेत. डॉ.दाभोलकर लिखित साहित्य, व्याख्यानाच्या सिडी, प्रकाशित पुस्तके, जादुटोणाविरोधी कायदा प्रबोधन पुस्तिका व अन्य साहित्यांची विक्री या दरम्यान होईल. राज्यातील सर्व जिल्ह्य़ांत हा उपक्रम २० नोव्हेंबपर्यंत चालणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रा.डॉ. सिध्दार्थ बुटले, बाबाराव किटे, अनिल मुरडीव, सुधाकर मिसाळ, प्रा. धनंजय सोनटक्के, पुष्पा जाधव, सारिका   डेहनकर,  प्रा.माधुरी झाडे यांनी केले आहे.

Story img Loader