फलज्योतिष शास्त्र असून त्याची सत्यता सिद्ध करा आणि १५ लाखांचे पारितोषिक जिंका, असे आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे. शेगाव येथे सुरू असलेल्या भारतीय ज्योतिष परिषदेला एकप्रकारे विरोध दर्शवला आहे. या परिषदेत मोठे ज्योतिषी सहभागी होणार आहेत. लोकांना काल्पनिक भविष्य सांगून दीर्घकाळापासून हे ज्योतिषी सर्वसामान्य माणसांच्या धार्मिक श्रद्धांचा फायदा घेऊन त्यांना आर्थिक, मानसिकरित्या लुबाडण्याचा धंदा करीत आहेत, ते त्यांनी थांबवावे. आधी फलज्योतिष शास्त्र आहे हे सिद्ध करावे, असे समितीने म्हटले आहे.
यासाठी समिती २० कुंडल्या देईल. त्याही ज्योतिष्यांनीच बनवलेल्या असतील. माणूस मृत की जिवंत आहे हे त्यांनी ९५ टक्के अचूक दोनदा सांगावे. हे शक्य नसेल तर ज्या गोष्टी नि:संदिग्धपणे तपासता येतात. शिक्षण, लग्न, मूल, अपघात, नोकरी व्यवसाय या सारख्या गोष्टींचे भाकीत २० कुंडल्यांद्वारे सांगावे. ते दोन्ही वेळेस ९० टक्के अचूक ठरले तरी अखिल भारतीय अंनिसचे १५ लाखांचे पारितोषिक घेऊन जावे. यापूर्वी १९८५मध्ये पुण्याला, १९८६मध्ये धुळ्याला, नंतर अमरावती, मुंबई, नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदांना हेच आव्हान केले होते. पण दरवेळी ज्योतिष्यांनी पळ काढला आहे. नागपुरात भरलेल्या परिषदेच्यावेळी नागपूर श्रमिक पत्रकार संघाने ‘फलज्योतिष्य किती खरे किती खोटे’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. प्राचार्य राम शेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली समितीच्यावतीने श्याम मानव आणि अखिल भारतीय ज्योतिष परिषदेच्यावतीने कालनिर्णयकार ज्योतिषी जयंत साळगावकर त्यात परिसंवादात बोलणार होते. मात्र, ऐनवेळी साळगावकरांनी माघार घेतली.
याहीवेळी नेहमीप्रमाणे शेगाव येथे होऊ घातलेली परिषदही अखिल भारतीय अंनिसच्या आव्हानातून पळ काढेल याची समितीला खात्री वाटते. आजकाल पुन्हा मोठय़ा प्रमाणावर सर्वसामान्य जनता फलज्योतिष्य, वास्तूशास्त्रासारख्या अंधश्रद्धांना बळी पडते आहे. म्हणून विदर्भातील ११ ही जिल्ह्य़ात पाच मार्च ते पाच मे या काळात एकूण ६० व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. ‘नशीब, फलज्योतिष्य किती खरे किती खोटे’ याविषयावर श्याम मानव या प्रबोधन यात्रेत बोलतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा