सोलापूर शहर भाजपच्या अध्यक्षपदी आमदार विजयकुमार देशमुख यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याने शहरात पक्षांतर्गत आमदार देशमुख यांच्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा झालेली ही निवड आमदार देशमुख यांना त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लाभदायक ठरण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र अध्यक्षपदाचा उपयोग संपूर्ण शहरात पक्षबांधणीसाठी यशस्वीपणे करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
शहरात भाजपमध्ये माजी खासदार लिंगराज वल्याळ, माजी महापौर किशोर देशपांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे आदी मंडळी पक्षांतर्गत घडामोडींपासून दूर गेली असून त्यांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग जवळपास नाहीसा झाला आहे, तर सध्या माजी खासदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख व मागील लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांचा कमी-जास्त प्रमाणात पक्षात बोलबाला असल्याचे दिसून येते. यात पक्षबांधणीसाठी अपेक्षित प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाहीत.
अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळालेले आमदार विजय देशमुख यांचा राजकीय पिंड नाही. केवळ देशमुख घराण्याचे वलय, वैयक्तिक संपर्क, लिंगायत समाजाचा प्रभाव आणि काँग्रेसअंतर्गत राजकारणातील बेदिलीचा लाभ या जोरावर आमदार देशमुख यांची वाटचाल सुरू आहे. पक्षाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात नाही. हीच परिस्थिती थोडय़ा-बहुत फरकाने माजी खासदार सुभाष देशमुख व अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या बाबततीत नमूद करता येईल. व्यवसायाने बडे कंत्राटदार असलेले सुभाष देशमुख हे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचा हात धरून भाजपच्या माध्यमातून राजकारणात आले. नंतर काही काळातच नशिबाने सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून १९९७ साली विधान परिषदेत जाण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा सोलापूर मतदारसंघात पराभव केल्याने देशमुख यांचे नाव चांगलेच झळकले.
एकीकडे भाजपच्या झेंडय़ाखाली आमदार व खासदारपद भूषविलेले सुभाष देशमुख यांचा लोकमंगल उद्योगसमूह तथा लोकमंगल परिवार म्हणजे भाजपच्या दृष्टीने सवतासुभा असल्याचे मानले जाते. सुभाष देशमुख हे सध्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर कार्यरत असले तरी भाजपपेक्षा लोकमंगल परिवाराचे अध्वर्यू म्हणून त्यांची जास्त प्रमाणात ओळख सांगितली जाते. पक्षाच्या व्यासपीठाऐवजी लोकमंगल परिवाराच्या व्यासपीठावर अधिक रमणारे देशमुख यांच्या प्रमाणेच अ‍ॅड. शरद बनसोडे यांचीही तऱ्हा आहे.
अ‍ॅड. बनसोडे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ गावचे. परंतु मुंबईत जाऊन ते मोठे झाले. नंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून एक-दोन चित्रपट निर्माण केले. त्याद्वारे चित्रपट अभिनेते म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करीत त्यांनी भाजपमध्ये स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापूर मतदारसंघ राखीव झाल्याने काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपची उमेदवारी बनसोडे यांना मिळाली होती. ते पराभूत झाले. मात्र नंतर त्यांचा सोलापूरशी भाजपच्या रूपाने अपेक्षित असलेला संपर्क हळूहळू लुप्त झाला. भाजपच्या ऐवजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विचारमंचच्या रूपाने विविध सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात बनसोडे हे रममाण झाले. ते अधूनमधून सोलापुरात येतात आणि सावरकर विचार मंचच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावून मुंबईला परत जातात. बनसोडे हे सावरकर विचारमंचच्या तुलनेने भाजपच्या व्यासपीठाचा वापर किती करतात, हा संशोधनाचा विषय ठरावा.
या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षी झालेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या जागा १६ वरून २६ पर्यंत वाढल्या. हे यश भाजपच्या पक्षबांधणीच्या जोरावर नव्हे तर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने दिलेला नकारात्मक कौल होता. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नकारात्मकता आणखी लाभदायक ठरली असती. त्यासाठी भक्कम नेतृत्व असायला हवे. भक्कम नेतृत्वाचा अभाव असल्याने भाजपची ही वाटचाल काठावरच उत्तीर्ण होणाऱ्या मुलासारखी झाली आहे. सध्या तरी शहरात आमदार देशमुख यांच्याएवढा तोलामोलाचा नेता पक्षाकडे नसल्याची बाब अधोरेखीत झाली आहे. म्हणून आमदार विजय देशमुख यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पुन्हा दुसऱ्यांदा पडली आहे. त्यांनी केवळ सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघापुरते राजकारण पाहता संपूर्ण शहरासाठी पक्षबांधणी हाती घ्यावी, अशी अपेक्षा सामान्य पक्ष कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

Story img Loader