तालुक्यातील भांडेवाडी येथे चंपाषष्ठीची वैशिष्टय़पूर्ण परंपरा आहे. येथे गेल्या दोन दिवसांपासून हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक घरामधून एक भाविक रात्री पेटती दिवटी घेऊन मिरवणुकीने खंडोबाचा जयघोष करीत दर्शनाला जाण्याची प्रथा आहे.
चंपाषष्ठी रविवारी होती, मात्र येथील परंपेनुसार शनिवारीच उत्सवाला सुरुवात झाली. त्या दिवशी येथे चुलीवर तवा मांडला जात नाही. शिजवलेले किंवा उकडलेलेच अन्न खाल्ले जाते. या दिवशी गहू व बाजरीच्या पिठाचे नागदिवे केले जातात. या दिव्यामंध्ये तूप घालून वाती ठेवल्या जातात व ते सर्व नागदिवे देवासमोर मांडून त्या वाती पेटवून तेवढे तूप जाळले जाते. हेच दिवे नंतर जेवणात घेतात. याशिवाय बाजरीचे बोळके, पण याच्यासोबत असतात. गव्हाच्या पिठाच्या चौघडय़ाही केल्या जातात. त्याही उकडून जेवणात घेतात. त्यासोबत लसणाची चटणीदेखील असते.
चंपाषष्ठीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी खंडोबाची तळी उचलली जाते. यासाठी किमान पाच मुले लागतात. त्यांना खंडोबाचे रूप समजले जाते. पांरपरिक गोंधळी प्रत्येक घरात जाऊन खंडोबाचा जयघोष करतात. तळी भंडारा उचलला जातो. त्यांनतर आलेल्या गोंधळी रूपातील वाघ्या खंडोबाची आरती म्हणतो त्याच वेळी परडी व कोटंबा हेदेखील बोलवले जातात. या सर्वाना पुरणपोळीचा नैवद्य दिला जातो. बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत याला विशेष महत्त्व असते. त्याचाही नैवद्य दिला जातो. रात्री प्रत्येक घरातील एक जण दिवटी पेटवून पठाण मळा येथील खंडोबाच्या मंदिरात दिवटय़ांची मिरवणूक काढून दर्शन घेतात. या वेळी मंदिराजवळ सर्व जण बेलभंडारा व खोबरे उधळतात. दिंवटय़ांनी खंडोबाचा जयघोष केला जातो व नंतर परत सर्व दिवटय़ा मिरवणुकीने परत घरी आणतात.
हरभरा भाजी ४०० रुपये किलो
या सणासाठी बाजरीच्या पिठाचे नागदिवे तयार केले जातात. त्यात हरभ-यांच्या हिरव्या ताजी भाजीचा वापर केला जातो. एरवी ही भाजी फेकून दिली जाते, मात्र चपाषष्ठीच्या दिवशी ही भाजी ४०० रुपये किलोच्या दराने विकली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा