जावलीचे प्रतिनिधित्व करत असताना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी निधीच्या मागणीसाठी संघर्ष करत होतो. आता दुष्काळी तालुक्याच्या जलसिंचन योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आली आहे. जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेत बदल करून दुष्काळी पट्टय़ातील जास्तीत जास्त गावांचा त्यात समावेश करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली. कायमच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या खटाव व माण तालुक्यातील जनतेच्या माथ्यावरील दुष्काळाचा ठपका कायमचा हटविण्यासाठी शरद पवार यांनी दुष्काळी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला नामदार होण्याची संधी दिली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.  
शशिकांत शिंदे यांची जलसंपदा व सातारा जिल्हय़ाचे पालकमंत्री म्हणून झालेल्या निवडीबद्दल आदर्शगाव म्हणून सन्मान प्राप्त झालेल्या निढळ (ता. खटाव)येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते सत्कारास उत्तर देताना बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रभाकर घार्गे  होते.  तर, निढळचे पुत्र व जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, अॅड. शंकरराव निकम, जिल्हा परिषद कृषी सभापती किरण साबळे-पाटील, सतीश फडतरे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुपेकर, तहसीलदार वैशाली राजमाने, गटविकास अधिकारी राहुल देसाई, उद्योजक पांडुरंग दळवी, सरपंच संगीता इंजे, उपसरपंच श्रीमंत निर्मळ, दत्तात्रय खुस्पे, आनंदराव दळवी यांची यावेळी उपस्थिती होती.
शशिकांत शिंदे म्हणाले, की दुष्काळी खटाव तालुक्यातील निढळ हा तसा डोंगरी व दुर्गम भाग. या भागातील बहुतेक गावांना सदैव पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे. परंतु दूरदृष्टी, कल्पकता आणि परिश्रमाच्या जोरावर आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावात व परिसरात जलसंधारणाच्या योजना यशस्वी राबवून पाणी टंचाईवर मात करण्यात यश मिळवले, ठिबक सिंचनचा वापर करून उपलब्ध पाण्यावर नगदी व फलोत्पादन शेतीला चालना दिली. यामुळे या भागातील आर्थिक व भौतिक प्रगती झाली आहे. निढळ गावाने शासनाच्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.  
प्रभाकर घार्गे म्हणाले, की शशिकांत शिंदे यांनी प्रभावी वक्तृत्व आणि डॅशींगपणाच्या बळावर जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने वाढविला आणि मतदारसंघात कोटय़वधी रुपयांची विकासकामे करून विकासपुरुष म्हणून नावारूपास आले. या कामाचे फळ म्हणून त्यांना जलसंपदामंत्री पदाची संधी शरद पवार व अजित पवार यांनी दिली आहे.
चंद्रकांत दळवी म्हणाले, की निढळसह परिसरातील गावांना कृष्णाखोरेचे पाणी मिळावे यासाठी यापूर्वीच येथे चळवळ उभी करण्यात आली होती. त्यानंतर निढळ, उंबरमळे, काताळगेवाडी, गोडसेवाडी, शिरवली या भागात जलसंधारणाची कामे ग्रामस्थांनी प्रभावीपणे केल्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यात यश आले.  हे सर्व निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. मात्र, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून निढळसह परिसर व माण तालुक्यातील गावांना कॅनॉलद्वारे पाणी देऊन ओढे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे भरणे गरजेचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उध्दार होईल. यासर्व बाबींचा विचार करून शशिकांत शिंदे कल्पकता आणि अधिकाराच्या जोरावर ते दुष्काळी भागातील पाणीप्रश्न तातडीने तडीस लावतील. प्रस्ताविक जगन्नाथ दळवी यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा