चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार असून शासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्डेन्नावर व शिवसेनेचे सुनील शिंत्रे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ३४५ मतदान केंद्रांमध्ये मतदानाची तयारी करण्यात आली असून २ हजार कर्मचारी व एक हजार पोलीस यांना तैनात करण्यात आले आहे.    
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. गेले पंधरा दिवस तिन्ही उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराचे रान उठविले होते. काल संध्याकाळी प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचाराला गती आली होती. तर आता कार्यकर्ते मतदान करून घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. या दृष्टीने वाहनांची जुळवाजुळव सुरू झाली असून तिन्ही उमेदवारांच्य समर्थकांनी विविध प्रकारची हजारो वाहने सायंकाळपासूनच ताब्यात घेतली आहेत    
या मतदारसंघात २ लाख ९० हजार मतदार आहेत. २६७ गावात २५२ इमारतींमध्ये ३४५ मतदानकेंद्रांतून मतदान होणार आहे. संवेदनशील असणाऱ्या २८ मतदान केंद्रांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान एकाच उमेदवाराला झाले अशा केंद्रांवर बारीक नजर ठेवली गेली आहे. त्यासाठी राज्य राखीव दलाची सहा पथके तैनात केली आहेत. मतदारसंघातील ९६.५५ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. ओळखपत्र नसेल तर सोळापैकी एक ओळखीचा पुरावा आणावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विवेक आगवणे यांनी केले आहे.     
मतदान केंद्रांविषयी माहिती देताना ते म्हणाले, प्रत्येक मतदान केंद्रात सहा कर्मचारी आहेत. त्याशिवाय ४३ सेक्टर ऑफिसरची नेमणूक केली आहे. त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले असून त्यांच्यासोबत व्हिडिओग्राफर व छायाचित्रकारांचे पथक असणार आहे. आठ ठिकाणी नाकाबंदीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गडहिंग्लज येथील एमआर हायस्कूलच्या मैदानावरून निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य दिले आहे. मतदान झाल्यानंतर स्ट्राँगरूम मध्ये मतदान यंत्रे ठेवली जाणार असून तेथेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शनिवारी सायंकाळीपासूनच मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील दारू दुकान व बिअर शॉपी बंद करण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या वेळी संपूर्ण दिवस दारू विक्री बंद राहणार आहे. मतमोजणी २८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजल्यापासून मतदानयंत्रे ठेवलेल्या गांधीनगर पॅव्हेलियन हॉल (गडहिंग्लज) येथे होणार आहे. दुपारी ३ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा