ज्येष्ठ साहित्यिका इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दी वर्षांत इंदिराबाईंचे पुत्र प्रकाश संत यांचा ‘चांदण्याचा रस्ता’ या त्यांच्या अखेरच्या ललित साहित्य पुस्तकाचे आणि इंदिराबाईंच्या स्नूषा सुधा संत उर्फ सुप्रिया दीक्षित यांच्या ‘अमलताश’ या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ मौज प्रकाशन गृहाच्या वतीने ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते कराड येथे झाला. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर, प्रभा गणोरकर, अनंत मनोहर, पद्मा भागवत, डॉ. सुप्रिया दीक्षित, अनिल कुलकर्णी, सुधीर एकांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.  
यावेळी बोलताना वसंत आबाजी डहाके म्हणाले की, आजच्या स्त्रिया आत्मकथन लिहू लागल्या आहेत. आमचा समाज कसा आहे आणि तो कसा असला पाहिजे, याची जाणीव करून देणारे सुप्रिया दीक्षितांचे ‘अमलताश’ हे आत्मकथन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घडून गेले, ते घडूनच गेले आहे, पण पुढच्या पिढीसाठीचा दृष्टिकोन विलक्षण महत्त्वाचा आहे. यातील तटस्थता ही विलक्षणच असल्याचे डहाके यांनी सांगितले. विशिष्ट समजुती असलेल्या समाजामध्ये एखाद्या स्त्रीला नुसतं शिक्षण नव्हेतर तिच्या प्रकृतीने विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेणे आणि आपले व्यक्तिमत्त्व उभे करणे हे किती कठीण असते याचे समग्र दर्शन ‘अमलताश’च्या आत्मकथनात असल्याचे ते म्हणाले.
लेखिका सुप्रिया दीक्षित यांनी प्रकाश संतांबरोबरचे सहजीवन आत्मकथानात वाचकांपुढे ठेवल्याचे प्रतिपादले. लेखनाच्या माध्यमातून प्रकाश संत हे जागतिक पातळीवर पोहोचले. प्रकाशचे सुरुवातीचे लेखन हळुवारपणे ना मा. संतांसारखे लघुनिबंधात्मक होते. त्यानंतर ललित लेखनाकडे जात त्यांनी ‘लंपन’ उभा केला. त्याच्यामुळेच मी समृध्द होऊ शकले, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर, प्रभा गणोकर आणि ‘मौज’च्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
 

Story img Loader