सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून प्रत्येक पालिका कर्मचाऱ्याने काम करावे, अशा सूचना महापालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिल्या. पालिकेच्या कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात संगणकीकरणाचा वापर करून प्रशासन लोकाभिमुख व पारदर्शक करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. महापालिकेचा घसरलेला कारभारावर वेसण घालण्यासाठी नूतन आयुक्त गुडेवार यांना जाणीवपूर्वक पाचारण करण्यात आल्याचे पालिका वर्तुळात बोलले जाते.
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुडेवार यांनी पालिकेतील प्रत्येक विभागाला भेट देऊन तेथील कामकाजाची खास रस दाखवून पाहणी केली. त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवादही साधला. कर आकारणी विभागास भेट दिली असता त्यांनी नागरिकांच्या मिळकतींच्या पुनर्विलोकनाबरोबर प्रथम अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ‘पुनर्विलोकन’ करण्याच्या सूचना दिल्या.
नूतन आयुक्त गुडेवार यांनी सहायक आयुक्त अजित खंदारे व डॉ. पंकज जावळे यांच्यासोबत साजेचार तासात सामान्य प्रशासन विभाग, सहायक आयुक्त महसूल, हद्दवाढ विभाग, मुख्य लेखापाल, अभिलेखापाल, आरोग्य विभाग, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर सचिव, भूमी व मालत्ता, अभिलेखापाल, नागरी सुविधा केंद्र, जनसंपर्क अधिकारी कार्यालय आदी विभागांतील कामकाजाची माहिती घेतली. तसेच महिला व बालकल्याण विभाग, एलबीटी वसुली कार्यालय, नागरी समुदाय विकास प्रकल्प, अन्न व परवाना या विभागांनाही नूतन आयुक्तांनी भेट देऊन कामकाजाची पद्धती समजावून घेतली.
अभिलेखापाल कार्यालयात अभिलेखापाल अलकुंटे यांना आयुक्त गुडेवार यांनी त्यांची जन्म तारखेची नोंद दाखविण्यास सांगितले व नोंदी पाहिल्या. संपूर्ण दस्ताऐवजाचे स्कॅनिंग करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
नूतन आयुक्त गुडेवार हे कडक शिस्तीचे भोक्ते समजले जातात. महापालिकेचा कारभार रसातळाला गेला असून विशेषत: आर्थिक शिस्त पूर्णत: ढेपाळली आहे. भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. पालिकेतील सत्ताधारी कारभाऱ्यांच्या मनमानी कारभाला वेसण घालण्यासाठी गुडेवार यांना जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचे बोलले जाते. आपल्या कार्यपद्धतीची चुणूक लवकरच पाहावयास मिळणार असल्याचे स्वत: गुडेवार हे सांगतात.
सोलापूर पालिकेचा कारभार रुळावर येण्यासाठी गुडेवार यांना पाचारण
सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून प्रत्येक पालिका कर्मचाऱ्याने काम करावे, अशा सूचना महापालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिल्या.
First published on: 08-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant gudewar new municipal commissioner of solapur corporation