चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे सरासरी ६७ व ७२ टक्के मतदान झाले. भरघोस मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी जाहीरातबाजी केली तरी शासनाने अनु. व भाग क्रमांकाच्या चिठ्ठय़ांचे वितरण न केल्याने व मतदान केंद्र मोठय़ा प्रमाणात बदलल्याने त्याचा थेट परिणाम मतदान कमी होण्यात झाला आहे, तर गडचिरोलीत मतदान प्रक्रिया आटोपून परत येणाऱ्या पोलिंग पार्टीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.
या तसेच गडचिरोली मतदारसंघात सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी उन्ह तापणार म्हणून शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रथम मतदान करणाऱ्या तरुण व नवमतदारांमध्ये मतदानासाठीचा उत्साह बघायला मिळत होता, तर गृहिणीही  कामे आटोपून आलेल्या होत्या. त्यामुळे पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ९ वाजेपर्यंत १० टक्के, तर गडचिरोलीत १०.२१ टक्के मतदान झाले होते. गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, कोरची, धानोरा या तालुक्यांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला. आदिवासी बांधव व महिला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानात सहभागी झाल्या. त्याचा परिणाम ११ वाजेपर्यंत गडचिरोलीत २१.३० टक्के मतदान झाले, तर चंद्रपूरमध्ये १५ टक्के मतदान झाले होते. दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत अतिशय वेगाने मतदान झाले. दुपारी १ पर्यंत चंद्रपुरात ३१.२३ टक्के मतदान झाले होते, तर दुपारी दोन तास मतदान केंद्रे ओस पडली होती, तर मुस्लिमबहुल भागात मतदानाचा वेग कायम होता. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत चंद्रपुरात ४३.५० टक्के, तर गडचिरोलीत ६३ टक्के मतदान झाले.
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यात भामरागड तालुक्यात ६५.४६ टक्के, सिरोंचा ६३ व अहेरी तालुक्यात ५५ टक्के मतदान झाले. दुपारी चार वाजतानंतर शहर व ग्रामीण भागातील वर्ग मतदानासाठी बाहेर पडला.
 सिव्हील, साईबाबा, तुकूम, पठाणपूरा, विठ्ठलमंदिर व गंज वार्डातील मतदान केंद्रांवर चांगली गर्दी बघायला मिळाली. दादमहल, नेहरू शाळा, रहमतनगर या मुस्लिमबहुल मतदान केंद्रांवर महिला व तरुण मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. चंद्रपूर मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५.९० टक्के, तर गडचिरोलीत जवळपास ६५ टक्के मतदान झाले. भाजपचे हंसराज अहीर, कॉंग्रेस आघाडीचे संजय देवतळे, आपचे अ‍ॅड.वामनराव चटप यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार नाना शामकुळे यांनी मतदान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा