पाणी कराच्या तडजोडीपूर्वीच उपायुक्तांची ७५ लाखाची ‘गुरुकृपा’
महानगरपालिका व गुरुकृपा असोसिएटमध्ये थकित पाणी कराच्या रकमेची तडजोड होण्यापूर्वीच उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी ७५ लाखाची बॅंक गॅरंटी परस्पर परत केल्याने महापालिकेला १ कोटी ३७ लाखाचा भरुदड बसला आहे. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा गाजणार आहे.
नगर पालिकेने २००४ मध्ये शहरातील पाणी पुरवठय़ाचे खासगीकरण करतांना गुरुकृपा असोसिएटला कंत्राट दिले होते. ७५ लाखाच्या बॅंक गॅरंटीवर या कामाचे कंत्राट गुरुकृपा असोसिएटला देण्यात आले होते. तेव्हा पालिका व गुरुकृपा कंपनीत झालेल्या करारानुसार पालिकेला ग्राहकांकडून पाणी करापोटी घेणे असलेले १ कोटी ३७ रुपये वसूल करून द्यायचे होते. त्यातील १० टक्के रक्कम गुरुकृपाने स्वत: ठेवायची होती आणि उर्वरीत सर्व रक्कम पालिकेच्या खात्यात जमा करायची होती. यानंतर सलग आठ वष्रे गुरुकृपा असोसिएटच्या माध्यमातून शहरात खासगी तत्वावर पाणी पुरवठा करण्यात येत होता. या काळात गुरुकृपाने ग्राहकांकडून थकित पाणी कराची वसुली सुध्दा केली. पालिका व गुरुकृपात दहा वर्षांंचा करार झालेला होता, मात्र हा करार पूर्ण होण्याच्या दोन वर्षांपूर्वीच गुरुकृपाने हात वर करून काम करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पालिकेनेही गुरुकृपा कंपनीकडून काम काढून घेतले.
या काळात गुरुकृपाची ७५ लाखाची बॅंक गॅरंटी पालिकेकडे जमा होती. गुरुकृपाने पालिकेकडे ही बॅंक गॅरंटी मिळावी, यासाठी रितसर अर्ज सादर केला, मात्र पालिकेला गुरुकृपाकडून १ लाख ३७ हजाराची रक्कम घेणे असल्याने प्रभारी आयुक्त वटी यांनी बॅंक गॅरंटी देण्यास स्पष्ट नकार दिला.
त्यावर गुरुकृपाने ग्राहकांनी थकित पाणी कराची रक्कम दिलीच नाही, असा युक्तीवाद करून पालिकेला तसे कारण दिले, परंतु पालिकेचे कर्मचारी प्रभागात फिरले असता गुरुकृपाने थकित पाणीकराची वसुली केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे गुरुकृपाने १ कोटी ३७ लाख रुपये प्रथम पालिकेकडे जमा करावे, असा आग्रह नगरसेवकांनीही धरला. यावरून पालिका व गुरुकृपामध्ये वाद सुरू असतांनाच उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी महापौर, आयुक्त व नगरसेवकांना विश्वासात न घेता गुरुकृपा असोसिएटला परस्पर ७५ लाखाची बॅंक गॅरंटी परत केली. ही बाब आता स्थायी समिती व नगरसेवकांच्या लक्षात येताच देवतळे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे.
गेल्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी या मुद्यावरून उपायुक्त देवतळे यांना धारेवर धरले. प्रकरण अंगावर शेकत असल्याचे बघून देवतळे यांनी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांना हाताशी धरून नगरसेवकांविरोधात घोषणाबाजी करायला लावली. अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांच्या गोंधळामुळे त्या सभेत कुठलाही निष्कर्ष निघू शकला नाही. येत्या शुक्रवारी होणाऱ्या सभेत आता पुन्हा एकदा हाच मुद्दा चर्चेला येणार आहे. गुरुकृपाला बॅंक गॅरंटी परत कशी केली, याचे कारण देवतळे यांनी
द्यावे अन्यथा, त्यांच्याकडूनच ७५ लाखाची वसुली करण्यात यावी, असा आग्रह आता नगरसेवकांनी लावून धरला आहे. दरम्यान, हा वाद सुरू असतांनाच देवतळे यांनी स्थायी समितीच्या नगरसेवकांची तक्रार आयुक्त प्रकाश बोखड यांच्याकडे केली आहे. गुरुकृपाच्या ७५ लाखाच्या बॅंक गॅरंटीवरून पालिकेत हा सर्व वादंग सुरू झालेला आहे.