सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या जिल्ह्य़ाच्या आठ तालुक्यातील सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दामदुप्पट दराने बियाणे व खते खरेदी केल्यानंतर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना यावर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे.
यावर्षी जिल्ह्य़ात पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली असून आतापर्यंत सरासरी ४८२ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. ७ जून ते १५ जून या कालावधीत अतिशय चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे वेगाने आटोपली. त्याचा परिणाम अवघ्या पंधरा दिवसात १ लाख ७२ हजार हेक्टरवर पेरणीची कामे पूर्ण झाली. यावर्षी ४ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन आहे. त्यात कापसाची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली, तर भाताचे पऱ्हे ८५ टक्के क्षेत्रात टाकण्यात आले आहेत. यंदा १३ हजार पऱ्हे टाकायचे आहेत. यातील साडेअकरा हजार पऱ्हे टाकले, तर सोयाबीनची १ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली. तूर व इतर पिकांची पेरणीही झाली. रिमझिम पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात शेतीच्या कामाने वेग घेतला आहे. जूनच्या पहिल्याच आठवडय़ात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची कामे हलकी झाली. उर्वरीत काम नंतर झालेल्या पावसाने केले. आता तर दोन दिवसापासून पावसाची झड लागली असल्याने येत्या दोन तीन दिवसात पेरणीची कामे पूर्ण होतील, असा अंदाज आहे.
शेतजमिनीत बियाणांची पेरणी केल्यानंतर साधारणत: सलग तीन ते चार दिवस उघाड पाहिजे. जमिनीतील बियाणाला सूर्यप्रकाश मिळाला की, त्याचे अंकूर फुटून रोपटे वर येते. मात्र, जिल्ह्य़ात सातत्याने पाऊस सुरू असल्याने पेरलेले बियाणांचे अंकूर जमिनीवर आलेच नाही. याचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. चिमूर, वरोरा, सावली, मूल व भद्रावती या सोयाबीन व धानाच्या पट्टय़ात ही परिस्थिती आहे. बहुतांश गावांमध्ये तर बियाणे मातीने झाकली गेल्याने तर जमिनीतच सडली, तर काही तालुक्यात वर आलेल्या रोपटय़ांवर मातीचे थर पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चिमूर, सावली व मूल या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद घेण्यात आली असून या भागातील धानाचे पऱ्हे पावसात वाहून गेले आहेत. हीच परिस्थिती पोंभूर्णा व गोंडपिंपरी या तालुक्यातही बघायला मिळत आहे. सोयाबीन व कापसाचे तालुके, अशी ओळख असलेल्या राजूरा, कोरपना, गोंडपिंपरी, बल्लारपूर या तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्थाही वाईट आहे. कारण, महागडे बियाणे घेऊनही शेतीत न उगवल्याने त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट कायम आहे. चंद्रपूर, सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड या तालुक्यांची परिस्थिती थोडी चांगली असली तरी पावसाने विश्रांती घेतली तरच या भागातील सोयाबीन, कापसाचे पीक वाचेल. अन्यथा, या तालुक्यांनाही दुबार पेरणीचा धोका आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरूच असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता कृषीखात्याच्या वतीने वर्तवली जात आहे. सध्यातरी शेतकऱ्यांना शेतीत पाणी साचू न देता ते बाहेर कसे निघेल, याकडे लक्ष देण्याची व रोप जिवंत ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे पुन्हा कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची बियाणांसाठी गर्दी झाल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.
१०१ कृषी केंद्राचे परवाने रद्द
या जिल्ह्य़ातील १०१ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यांच्या संचालकांना बियाणे, खते व औषधांच्या साठय़ाची माहिती वारंवार मागण्यात आली. मात्र, ती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने या सर्वाचे परवाने रद्द केले. यातील एकाही कृषी केंद्राला खते, औषध व बियाणे विक्री करता येणार नाही. जिल्ह्य़ातील १२०० कृषी केंद्रांपैकी १०१ परवाने रद्द केल्यानंतर या सर्व कृषी केंद्रांवर करडी नजर ठेवण्यासाठी १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अशोक कुरील यांची गोंदिया येथे बदली झाली असून नवे कृषी अधीक्षक म्हणून बनसोड रुजू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांच्याकडे नोंदवाव्यात.