सात पक्ष्यांच्या नोंदीने पक्षीतज्ज्ञांमध्ये उत्साह
पट्टेदार वाघ व बिबटय़ांसाठी प्रसिध्द असलेला चंद्रपूर जिल्हा आता माळढोक पक्ष्यासाठी सुध्दा ओळखल्या जाऊ लागला असून नुकत्याच झालेल्या गणनेत वरोरा तालुक्यात सात माळढोक पक्षी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. यात दोन नर व पाच मादी माळढोकचा समावेश आहे. वाघ व बिबटय़ाचे अस्तित्व राज्यात व देशभरातील जंगलात बघायला मिळते. परंतु माळढोक हा पक्षी अतिशय दुर्मिळ म्हणून ओळखल्या जातो. विदर्भात केवळ गोंदिया जिल्हय़ातील नवेगाव येथे माळढोक पक्षाचे संवर्धन अतिशय चांगल्या पध्दतीने होत आहे. मात्र, इतरत्र हा पक्षी अतिशय दुर्मिळ आहे.
वन खात्याने नुकतीच माळढोक पक्षाची गणना केली असता वरोरा तालुक्यात सात माळढोक पक्षी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे यांच्या नेतृत्वात अकरा गट तयार करून ही गणना करण्यात आली. एकूण २५ वन कर्मचाऱ्यांनी माळढोक पक्षाच्या अधिवास क्षेत्रात हा गणना कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पध्दतीने राबविला. संपूर्ण राज्यात एकसाथ ही गणना करण्यात आली असून जिल्हय़ात एकटय़ा वरोरा तालुक्यात सात माळढोक दिसले आहेत. गणनेत वरोरा वनपरिक्षेत्रातील तुलाना, एकोना, गणेश मंदिर, मार्डा, माधोभट्टी शिवार, चरूर खाटी शिवार, शेंबल करंजी शिवार, आर्वी तुमगाव शिवार, आशी खरवड, आष्टी शिवार, वनोजा कैनल तथा संस्कार भारती परिसर या ठिकाणी या सात माळढोक पक्षांची नोंद घेण्यात आलेली आहे.
नागपूरचे ज्येष्ठ माळढोक अभ्यासक गोपाळ ठोसर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गणना कार्यक्रम राबविण्यात आला. माळढोक हा पक्षी जोडीदारासोबत राहातो. तसेच त्याचे तलावाच्या काठावर वास्तव्य असते. कधी काळी या जिल्हय़ात माळढोक पक्ष्यांची मोठी संख्या होती. परंतु, औद्योगिक विकासाने ही संख्या रोडावत गेली आहे. वरोरा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग सुरू होत असल्याने माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी आता या परिसरात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कडक र्निबध लादण्यात आले आहेत. सोबतच वरोरा हे माळढोक पक्षाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट ठिकाण असल्याचे अभ्यासाअंती सिध्द झाल्याने वन खात्याच्या वतीने माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रकल्प सुध्दा राबविण्यात येणार आहे. सध्या तरी वन खात्याच्या वतीने वरोरा वनपरिक्षेत्रात नियमित उपाययोजना करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी सुरू आहे.

जोडीदाराचा विरह..
वरोरा सोबतच जुनोना तलावाच्या काठावर सुध्दा माळढोक पक्षाची जोडी दिसत होती. परंतु, जोडीदाराचा मृत्यू झाल्याने बरेच दिवस मादी माळढोक तलावाच्या काठावर एकटीच बसून राहात होती. गेल्या काही दिवसांपासून ती सुध्दा दिसेनासी झाली आहे. त्यामुळे या मादी माळढोक पक्ष्याचा शोध सुध्दा वन खात्याच्या वतीने घेतला जात आहे. जुनोना येथे माळढोक संवर्धन प्रकल्प तयार केला तर अतिशय उत्कृष्ठ होईल अशी सूचना काही वन्यजीव प्रेमींनी केली आहे. त्यावरही गांभीर्याने विचार सुरू आहे. परंतु जिल्हय़ातील सात माळढोकचे अतिशय उत्कृष्टपणे संवर्धन होणे गरजेचे असून त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी अशीही सूचना समोर आली आहे. सध्यातरी वन खात्याने सात माळढोक पोषक वातावरण मिळावे म्हणून प्रयत्न चालविले आहेत.

Story img Loader