सलग दुसऱ्यांदा येथील महापौरपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदावर डोळा ठेवून असलेल्या अनेक नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे, तर महापौराच्या खुर्चीत आपलीच नगरसेविका पत्नी बसावी म्हणून सर्व इच्छुकांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
महापौर संगीता अमृतकर यांचा अडीच वर्षांचा कालावधी ३० ऑक्टोबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच येथील महापौरपदाची निवडणुकही होणार आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविकांपेक्षा त्यांच्या पतीराजांनीच आतापासूनच जुळवाजुळव सुरू केली आहे. येथील महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. या पदावर डोळा ठेवून असलेले सभापती रामू तिवारी, उपमहापौर संदीप आवारी, भाजपचे धनंजय हुड, अनिल फुलझेले यांचा हिरमोड झाला आहे, तर विद्यमान महापौर संगीता अमृतकर यांचे पती गोपाल अमृतकर, काँग्रेसचे संजय कंचर्लावार, राष्ट्रवादीचे सतीश त्रिवेदी व वीरेंद्र लोढीया यांच्यात उत्साह संचारला आहे. जणू काही आपणच महापौर होणार, अशा थाटात त्यांनी पत्नीला या पदी विराजमान करण्याची तयारी सुरू केली आहे. मनपात कॉंग्रेस-शिवसेना अभद्र युतीची सत्ता आहे. मात्र, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात यासाठी होणारी  निवडणुक विधानसभा निवडणुकीसोबतच येणार असल्याने कांॅग्रेस, शिवसेना किंवा कॉंग्रेस-भाजप, अशी अभद्र युती निवडणुकीच्या काळात शक्य नाही. त्यामुळे कॉंग्रेस व भाजपला या पदाच्या निवडणुकीसाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहे.
कॉंग्रेसकडून या पदासाठी विद्यमान महापौर संगीता अमृतकर, राखी कंचर्लावार, सुनिता अग्रवाल व सुनिता लोढीया, तर राष्ट्रवादीकडून संगीता त्रिवेदी यांच्यापेक्षा त्यांचे पतीदेवच अधिक इच्छूक आहेत. भाजपकडून अंजली घोटेकर हे एकमेव नाव आहे. येथील मनपात एकूण ३३ प्रभाग व ६६ नगरसेवक आहेत. यात महिला व पुरुष नगरसेवकांची संख्या समान आहे. त्यातही कॉंग्रेस आघाडीत सर्वाधिक ३६ नगरसेवक असून त्यापाठोपाठ भाजप १८, शिवसेना ५, राष्ट्रवादी ४, बसप, मनसे व भारिपचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. स्थानिक मनपात सध्या कॉंग्रेस, शिवसेना आघाडीची सत्ता असून कॉंग्रेसच्या संगीता अमृतकर महापौर आहेत. आता हे पद पुन्हा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित निघाल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर त्यांच्यासोबतच कॉंग्रेसच्या सुनिता वीरेंद्र लोढीया, राष्ट्रवादीच्या संगीता सतीश त्रिवेदी, राखी संजय कंचर्लावार, सुनिता अग्रवाल, अनिता कथडे व तिकडे भाजपमध्ये अंजली घोटेकर यांनाही या पदाची स्वप्ने पडू लागली आहेत, परंतु नगरसेवकांच्या बेरीज-वजाबाकीचे गणित मांडणारी महिलाच आता या पदी विराजमन होईल, अशी सध्या स्थिती आहे. कारण, कांॅग्रेसच्या गटात ३६ नगरसेवक असले तरी ते माजी खासदार नरेश पुगलिया, रामू तिवारी व नंदू नागरकर, अशा तीन गटात विभागले गेले आहेत. यात पुगलिया यांच्याकडे १५, तिवारी गटाकडे १५ व नागरकर यांच्या पाठीशी ६ नगरसेवक आहेत.
विशेष म्हणजे, कॉंग्रेसच्या या तिन्ही गटाचे एकमेकांशी अजिबात सख्य नाही. रिलायन्सच्या मुद्यावरून मतभेद झाल्याने रामू तिवारी, संतोष लहामगे व  महापौर संगीता अमृतकर या माजी खासदार नरेश पुगलिया गटातून बाहेर पडले आहेत. तिकडे नंदू नागरकर सहा नगरसेवकांसह मनपात स्वतंत्र राजकारण करीत आहेत, तर पुगलियांना तिवारी व नागरकर या दोघांचेही तोंड पाहण्याची इच्छा नाही. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीच्या वेळी ते दोघांनाही सोबत घेण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची मदत घ्यावीच लागेल. राष्ट्रवादीतून संगीता त्रिवेदी व भाजप नगरसेविकांनाही या पदाची स्वप्न पडत आहेत. त्यामुळे या पदाच्या निवडणुकीचे चित्र कसे राहील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तिकडे महापौर संगीता अमृतकर यांनी तर सध्या जसे सुरू आहे तसेच सुरू राहावे, अशी इच्छा बोलून दाखविली आहे, परंतु पुगलिया गटाच्या नगरसेवकांना त्या चालत नाहीत. त्यामुळे अमृतकरांना खुर्ची शाबूत ठेवायची असेल तर आतापासूनच नगरसेवकांची जुळवाजुळव करावी लाणार आहे, तसेच रामू तिवारी व संतोष लहामगे यांनाही मनपातील त्यांच्या गटाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर प्रयत्न करावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा