अतिवृष्टी व पुरामुळे २२ दिवस मार्ग बंद असल्याने, तसेच नक्षलवाद्यांचा बंद व लग्नतिथीअभावी प्रासंगिक करार न झाल्याने यंदा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागाला बसच्या ६ लाख किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्यामुळे ५ कोटींचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती असून चंद्रपूर विभागाच्या भारमानात २.७४ ने घसरण झाली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागांतर्गत संपूर्ण गडचिरोली जिल्हा, तसेच या जिल्ह्य़ातील पंधरा तालुक्यांचा समावेश आहे. कधी काळी चंद्रपूर विभाग हा आर्थिकदृष्टय़ा फायद्यात होता, परंतु गेल्या काही वर्षांत अवैध प्रवासी वाहतुकीसोबतच अतिवृष्टी, नक्षलवाद्यांचा बंद व लग्नसराईच्या बदलत्या स्वरूपामुळे एस.टी. महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ांत जुलै ते सप्टेंबर अशा सलग तीन महिन्यांत अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला. परिणामत: जिल्ह्य़ातील बहुतांश छोटे-मोठे बारमाही रस्ते पुरामुळे बंद झाले. अहेरी-नागपूर, राजुरा-नागपूर, गडचिरोली-नागपूर तसेच लांब व मध्यम पल्ल्यांचे मार्ग या तीन महिन्यांत २२ दिवस बंद होते. त्यामुळे एस.टी.ला ४.९२ लाख किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन भारमान कमी होऊन या सेवा या कालावधीत बंद असल्यामुळे त्याचा परिणाम ६ लाख किलोमीटरच्या फेऱ्या रद्द होण्यात व विभागाच्या उत्पन्नावर झाला आहे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये फार मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून या भागात नेहमीच नक्षल सप्ताह पाळण्यात येत असल्याने मुख्य मार्गावर झाडे तोडून टाकणे, रस्ता खोदून ठेवणे, निरपराध नागरिकांची हत्या, वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्यात नक्षलवाद्यांचा बंद राहत असल्यामुळे वाहतूक बंद ठेवावी लागते. त्यामुळे ७० हजार ४६२ किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे प्रवासी वर्दळ कमी होऊन उत्पन्नावर परिणाम झाला. एस.टी. आर्थिक तोटय़ात जाण्यासाठी तिसरे प्रमुख कारण लग्नसराई व लग्नतिथी आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत फार मोठय़ा प्रमाणात लनतिथी असल्यामुळे तब्बल ८३१ प्रासंगिक करार झालेले होते. या वर्षी त्यात कमालीची घट होऊन केवळ ६९१ एवढेच प्रासंगिक करार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रासंगिक करार लांब पल्ल्यांसाठी मोठय़ा प्रमाणात झाले, परंतु आता बहुतांश कुटुंबांत नोंदणी विवाह, तसेच कमी वऱ्हाडी नेणे सुरू झाल्याने हे करार कमी होत आहेत. त्याचाही फटका एस.टी.ला बसला.
या वर्षी लग्नतिथी कमी असल्याने प्रासंगिक कराराचे किलोमीटर ०.१२ लाखांनी कमी झाले, तसेच लग्न नसल्यामुळे प्रवासी वर्दळ कमी होऊन त्याचा परिणाम उत्पन्न व भारमानावर झाला. चंद्रपूर विभागाचा विचार केला, तर गेल्या वर्षी आगाराचे भारमान ५७.७९ होते. या वर्षी ५५.०५ असून गेल्या वर्षीच्या तुलनेत भारमानात २.७४ ने कमी झाली आहे.
या वर्षी ५५.०५ भारमानातून एस.टी.ला ८ कोटी ४६ लाख ९९ हजारांचे उत्पन्न झाले. मानव विकास योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बससेवेमुळे एस.टी.च्या नियमित भारमानावर परिणाम झाल्याची माहिती चंद्रपूर विभागाचे नियंत्रक भसारे यांनी दिली.
 विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेंतर्गत गेल्या वर्षी ५५ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. या वर्षी दुप्पट म्हणजे ११० बसेस सुरू असून त्याचे भारमान अतिशय कमी आहे. त्याचाही फटका एस.टी.च्या आर्थिक उत्पन्नावर झाल्याची माहिती त्यांनी दिली.
स्कूलबसमुळे अवैध प्रवासी वाहतुकीत वाढ
अवैध प्रवासी वाहतुकीत या जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून कॉन्व्हेंट व महाविद्यालयांच्या स्कूलबसच्या माध्यमातून चंद्रपूर-गडचिरोली या रस्त्याने सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर ट्रॅव्हल्सच्या केवळ २० फेऱ्या व्हायच्या. या वर्षी त्या वाढून दिवसाला ६० झाल्या आहेत. यातील बहुताांश फेऱ्या स्कूल बसच्या होत आहेत. स्कूल बसला परमिट लागत नसल्याने ही अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आरटीओ व पोलीस दलाशी समन्वय ठेवून अशा वाहनांची तपासणी करण्यात आली. विनापरवानगी वाहतूक करणाऱ्या ८ ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली. गडचिरोली आरटीओसोबत या जिल्हय़ात रा.प. कर्मचारी व रा.प. खाते वाहन देऊन अशा वाहनांची सातत्याने तपासणी करण्यात आली. काही दिवस ही वाहतूक बंद दिसली. मात्र, आता पुन्हा ती जोमाने सुरू झाली आहे. अनेक कॉन्व्हेंट व महाविद्यालयांच्या स्कूल बसेस सकाळी ८ व दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ने-आण करतात. मात्र, त्यानंतर या चंद्रपूर-गडचिरोली या रस्त्याने प्रवासी वाहून नेत असल्याची धक्कादायक माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली.

Story img Loader