कलंदरांनाही मोठे करणारे हक्काचे ‘फिक्सिंग’ व्यासपीठ
राज्य नाटय़ स्पध्रेत बक्षीस मिळवण्यासाठी केली जाणारी वशिलेबाजी काही नवी नाही. हौशी कलावंतांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने सुरू करण्यात आलेली ही स्पर्धा आता पूर्णपणे रसातळाला गेल्याचे येथील केंद्रावर झालेल्या ‘फिक्सिंग’ ने सिध्द झाले आहे. अभिनय किंवा लेखन याचा गंध नसलेले कलंदर सुध्दा या स्पध्रेत वशिलेबाजीच्या माध्यमातून उत्कृष्ट लेखक व कलावंत म्हणून नावारूपाला येऊ शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
राज्यातील हौशी व प्रायोगिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून सांस्कृतिक संचालनालय दरवर्षी ही स्पर्धा घेते. अलीकडच्या काही वर्षांत मात्र ही स्पर्धा पूर्णपणे वशिलेबाजांच्या हातात गेल्याचे सर्वत्र दिसून येते. त्यामुळे अनेक चांगल्या कलावंतांनी या स्पध्रेकडे कायमची पाठ फिरवली आहे. सांस्कृतिक खाते यावर गंभीरपणे विचार करण्याऐवजी झालेल्या आरोपांवर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न करत असल्याने आता प्रेक्षकांनाही उबग यावा, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. येथील केंद्राचा जाहीर झालेला निकाल पूर्णपणे मॅनेज करण्यात आला होता, असा आरोप ‘नवोदिता’ या संस्थेने केला. स्पध्रेच्या निकालावर कुणाला आक्षेप असणे यात नवे काही नाही. ज्यांना बक्षीस मिळत नाही ते नाराज होणे स्वाभाविक आहे, मात्र ‘नवोदिता’ने आरोप करतांना परीक्षकांच्या कारनाम्यांचा जो भंडाफोड केला आहे तो गंभीर आहे.
या स्पध्रेत दरवर्षी भाग घेऊन व नंतर वशिलेबाजीच्या माध्यमातून बक्षीसे मिळवून प्रतिभावान असल्याचा दावा करणारे अनेक कलंदर ठिकठिकाणी आढळतात. या कलंदरांच्या आमिषाला परीक्षकांनी बळी पडावे व त्याची जाहीरपणे वाच्यता व्हावी, हा प्रकारच चीड आणणारा आहे.
येथील केंद्रासाठी जे तीन परीक्षक नेमले त्यापैकी दोघांनी ‘मित्र’ संस्थेच्या नाटकाला प्रयोग चांगला झाला नसतांना प्रथम क्रमांक दिला, असा आरोप ‘नवोदिता’ने नाही, तर तिसऱ्या परीक्षकानेच सांस्कृतिक खात्याकडे पत्र पाठवून केला आहे, हे विशेष. नागपूरच्या दीपरंग स्पध्रेत एकही बक्षीस मिळवू न शकणारे हे नाटक येथे चक्क प्रथम आले. तीनपैकी एक परीक्षकच आता निकाल मॅनेज झाला, असे सांगत असेल तर या आरोपाची चौकशी होणे गरजेचे आहे. कलावंताला जात नसते, असे म्हणतात, पण येथे एका परीक्षकाने जातीसाठी माती खाणे पसंत केले. या स्पध्रेसाठी किमान विभागाबाहेरचे परीक्षक द्यावे, हे सुध्दा सांस्कृतिक खात्याला सुचले नाही. ही स्पर्धाच सध्या एकमेकांना उपकृत करणे, एकमेकांचा काटा काढणे, याच तत्वावर सुरू आहे. आधी परीक्षक असलेले नंतर यथावकाश कलावंत होतात व नंतर हेच चक्र उलटय़ा बाजूने सुध्दा सुरू राहते. गंमत म्हणजे, याच केंद्रावरील स्पध्रेत एक व्यावसायिक नाटक सादर झाले. त्याचा प्रयोग दर्जेदार झाला. व्यावसायिक नाटक सादर करणे नियमाला धरून नसल्याने त्याला स्पध्रेतून उडवण्यासाठी आता भांडणाऱ्या तीन संस्था तेव्हा एकत्र आल्या. आता निकाल लागताच या संस्था एकमेकांविरुध्द गरळ ओकू लागल्या आहेत. बक्षीस मिळाले नाही म्हणून आरोप करणाऱ्या ‘नवोदिता’ने याआधी कधीच वशिलेबाजी केली नव्हती काय, या प्रश्नाचे खरे उत्तर यानिमित्ताने सर्वाना मिळणे गरजेचे आहे. मॅनेज करणे जमले तर चांगला निकाल आणि नाही तर वाईट, ही वृत्ती कलावंतांना शोभणारी नाही. आरोप करतांनाही ज्या नाटकाला पहिले बक्षीस मिळाले त्याला सोडून दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या ‘स्नेहांकित’ संस्थेच्या नाटकातील चुका दाखवण्याचा दुटप्पी प्रकारही या प्रकरणात दिसून आला. वाघ सोडून शेळीच्या मागे लागण्यासारखाच हा प्रकार होता. स्थानिक पातळीवरच्या हेवेदाव्यातून असे प्रकार घडत असले तरी या आरोपाच्या निमित्ताने या स्पध्रेच्या फारशा शिल्लक न राहिलेल्या गुणवत्तेवर मात्र प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. अन्याय झाला अशी ओरड संस्थेने करणे याकडे दुर्लक्ष करता येईल, पण शासनाने नेमलेला परीक्षकच वशिलेबाजी झाली असे म्हणतो, हा प्रकार निश्चित चौकशीसाठी पात्र ठरतो. आता सांस्कृतिक खाते काय करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.