पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढाकारातून जिर्णोध्दार झालेल्या चांदवड येथील रेणुका देवी मंदिराचे स्वरूप सोई सुविधांमुळे पूर्णपणे पालटले आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या या प्राचीन मंदिराच्या कामातील टिकाऊपणा पाहताक्षणी लक्षात येतो. पावसाळ्यात बहरणाऱ्या हिरवाईमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलत असल्याने पर्यटन स्थळ म्हणून आता या देवस्थान परिसराचा विकास करण्यात येत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडपासून तीन किलोमीटर अंतरावर हे अतिप्राचीन मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७३५ ते १७९५ च्या दरम्यान केला. तेव्हा जवळपास ४०० एकर क्षेत्र मंदिर परिसर म्हणून ओळखले जात होते. होळकर सरकारच्या मालकीच्या सव्‍‌र्हे क्रमांक २५० मधील गट क्रमांक ७३१/१/२ या शेत जमिनीत अहिल्याबाईंनी देवस्थानचा विकास केला. मंदिराचे काम करताना किती दूरदृष्टी दाखविण्यात आली, त्याची प्रचिती सहज येऊ शकते. १९६२ मध्ये या मंदिराची जबाबदारी विश्वस्त मंडळावर आली. तेव्हापासून मंदिराची देखभाल व पूजापाठ विश्वस्तांकडून केली जात आहे.
मंदिराकडे जाण्यासाठी पूर्वी गावातून जाणारा एकच मार्ग होता. परंतु महामार्गामुळे भाविक वाहने उभी करून दर्शनासाठी येऊ लागल्याने त्यांच्यासाठी खास पायऱ्या करण्यात आल्या आहेत. गावातून मंदिराकडे जाताना दगडाच्या सहाय्याने तयार केलेल्या ७० ते ८० पायऱ्या चढाव्या लागतात. महामार्गावरून मात्र पायऱ्या उतरून खाली यावे लागते. भल्यामोठय़ा कमानीपासून मंदिर परिसर सुरू होतो. मंदिरात गणपती, आदिमाया, महादेवी यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी दोन दरवाजे आहेत. प्रांगणात तुळशी वृंदावन, यज्ञकुंड असून गाभाऱ्यात दोन्ही बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सभामंडप बांधून दिले आहेत.
हे सभामंडप तसेच मंदिराचा गाभारा संपूर्ण दगडात कोरलेला आहे. या ठिकाणी रेणुकादेवीची भव्य मूर्ती असून शेजारीच परशुरामाचे स्थान आहे. मंदिरापुढील भिंतीचे बांधकाम घडीव दगडात करण्यात आले आहे. मंदिराबाहेरील पटांगणात अत्यंत उंच असे दोन दगडी दीपस्तंभ असून पुढे मंदिराकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत. भक्तांसाठी विश्वस्त मंडळाने निवारागृह
बांधले आहे.
नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. नवरात्रात १० दिवस रेणुकादेवीची पालखी होळकर वाडय़ातून सकाळी नऊ वाजता निघून मंदिरात जाते. सायंकाळी सात वाजता होळकर वाडय़ात परत नेण्यात येते. दर पौर्णिमेलाही सकाळी परंपरेप्रमाणे देवीची पालखी निघते. गावातील रंग महालातून अहिल्यादेवी या रेणुकामातेच्या दर्शनाला पालखीने जात असत.
पालखीची परंपरा आजही विश्वस्त मंडळाने जपली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विश्वस्त मंडळाने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली आहे. रस्तामार्गे मंदिराच्या प्रांगणात उतरण्यासाठी पायऱ्यांचे बांधकामही करण्यात आले आहे. मंदिरापासून काही अंतरावर होळकर इस्टेटने बांधलेला पुरातन तलाव दिसतो.
चांदवडसारख्या टंचाईग्रस्त भागातील या तलावात बाराही महिने पाणी असते. देवस्थान परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला
जात आहे. भक्त निवास, विश्रांतीगृह, प्रसाधने, वाहनतळ अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.