शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षा करणाऱ्या शिक्षकांना शिक्षा करण्याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. मात्र या शिक्षकांच्या शिक्षेच्या तरतुदीत बदल करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितली.
पत्रकार परिषदेत बोलताना दर्डा म्हणाले, की शाळेत अभ्यास न करणाऱ्या मुलांना शिक्षक शिक्षा करतात. मात्र अशी शिक्षा यापुढे करता येणार नाही. शिक्षा करणाऱ्या शिक्षकांनाच आता शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. केंद्र सरकारने कायद्यात तशी तरतूद केली आहे. यासंदर्भात बोलताना दर्डा म्हणाले,‘‘तमिळनाडू, आंध्र या प्रदेशात विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही म्हणून तीन दिवस विद्यार्थ्यांला
वर्ग खोलीत डांबून ठेवण्याच्या घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याची तरतूद केंद्राने केली आहे.’’ मात्र, या नियमामध्ये महाराष्ट्राचे शिक्षण खाते शैक्षणिक गुणवत्तेसाठी समन्वय राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यात अनेक शाळा विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्य़ा, पुस्तके, गणवेश व इतर साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करतात. त्याविरूध्द केंद्र सरकारच्या तत्कालीन मनुष्यबळ विकास राज्यमंत्री पुरंदरेश्वरी देवी यांच्या समितीने चाप लावला आहे.
पुरंदेश्वरी देवी समितीमध्ये देशातील सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या शिफारशींप्रमाणे कायद्यात तरतूद केली जाणार आहे.
हा मसुदा तयार झाला असून मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे जाणार आहे. या मसुद्यामध्ये देणगी घेणाऱ्या शाळांवर कारवाई, तसेच शाळेतून शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्यावर चाप लावण्यासाठी कठोर नियम तयार करण्यात आल्याचे दर्डा यांनी सांगितले.