ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचे आणि तितकेच वाहतूक कोंडीचे आगार बनलेले तीन हात नाका, तसेच नितीन कंपनी या दोन्ही प्रमुख चौकांमधील कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी ठाणे महापालिकेने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यासाठी या भागातून नियमितपणे प्रवास करणाऱ्या काही रहिवाशांच्या सूचनाही विचारात घेतल्या जात आहेत. यासंबंधी वाहतूक पोलिसांकडे काही सूचना यापूर्वी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक करताना या सूचना विचारात घेतल्या होत्या. आता महापालिकेनेही नवा आराखडा तयार करताना प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
ठाणे शहरातील वाढत्या नागरीकरणाबरोबरच दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. परिणामी शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागल्याने काही चौक कोंडीचे आगार ठरू लागले आहेत. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका तसेच नितीन कंपनी जंक्शनवरील वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल, याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. तीन मिनिटांच्या सिग्नलमुळे तीन हात नाका जंक्शनवर वाहनांच्या रांगा लागत असल्याने, शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी रोटेशन पद्धतीने सिग्नलवरील मिनिटे कमी करता येतील का, याची चाचपणी महापालिका करीत असून, प्रायोगिक तत्त्वावर सिग्नलवरील वाहतूक बदल राबविण्याचा विचार महापालिका करीत आहे. मात्र प्रकाश शेळके या नागरिकाने सात ते आठ महिन्यांपर्वीच रोटेशन पद्धतीने सिग्नलवरील मिनिटे कमी करण्याचा प्रस्ताव महापालिका तसेच वाहतूक शाखेपुढे ठेवला आहे. तीन हात नाका येथील जंक्शनवर पाच ते सात कमानी असून, त्यापैकी एक सिग्नल सुरू असेल तर उर्वरित पाच कमानींवर येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे काही वेळेस वाहनचालक सिग्नल तोडण्याचा प्रयत्न करतात. या पाश्र्वभूमीवर प्रकाश शेळके या ठाणेकर प्रवाशाने तीन हात नाका जंक्शनचा सविस्तर अभ्यास करून यासंबंधीचा एक प्रस्ताव महापालिकेस सादर केला होता. या प्रस्तावामुळे सिग्नल तीन मिनिटांऐवजी एक मिनिटावर येईल आणि वाहनांच्या रांगा कमी होतील. तसेच वाहनांना शिस्तही लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

रोटेशन सिग्नलचा प्रस्ताव..
तीन हात नाका जंक्शनवर सुरू असलेली सद्यस्थितीतील वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागेल. उड्डाणपुलाखाली दोन कमानींजवळ रस्ते तयार करावे लागतील आणि तेथे सिग्नल यंत्रणा बसवावी लागेल. कमानीच्या दोन्ही बाजूंच्या दोन कमानींतून वाहतूक सुरू करायची. त्यामुळे वाहतूक वर्तुळाकार सुरू राहील आणि डाव्या बाजूने वाहनांना इच्छित स्थळी जाता येईल. वर्तुळात प्रवेश करण्यासाठी सिग्नल चालू राहतील. त्यासाठी सिग्नलचा कालावधी २० सेंकदांचा असेल. मात्र एकाच वेळी तीन सिग्नल वर्तुळात प्रवेश करणाऱ्या वाहनांना प्रवेश देतील. हे तिन्ही सिग्नल एकामागोमाग एक सुरू असतील. यापूर्वी नितीन कंपनी जंक्शनजवळ असा प्रयोग झाला होता. मात्र वर्तुळ लहान आणि एकाच वेळी सर्व मार्गावरील वाहने सोडल्यामुळे तो अपयशी ठरला होता. त्यामुळे या प्रयोगासाठी मोठे वर्तुळ करण्याची गरज आहे. तसेच नितीन जंक्शनजवळ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग असल्यामुळे येथील सिग्नल आणखी कमी होऊ शकतो, अशी माहिती प्रकाश शेळके यांनी दिली. दरम्यान, या भागातून नियमितपणे प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांच्या सूचनाही यासंबंधी मागविल्या जात असून, आराखडय़ाला अंतिम स्वरूप देताना या सूचना महत्त्वाच्या ठरतील, असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला.