दरवर्षीप्रमाणे रस्ते अडवून उत्सव साजरा करण्याचा शिरस्ता ठाण्यातील काही दहीहंडी मंडळांनी सुरूच ठेवला असून त्यामुळे या उत्सवाच्या तोंडावर शहरात तात्पुरते वाहतूक बदल करण्याची कसरत ठाणे पोलिसांना करावी लागणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलानुसार टेंभीनाका आणि ओपन हाऊस या दोन्ही चौकाकडे जाणारे वाहतूक मार्ग बंद करण्यात आले असून या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे. तसेच मुंबई-ठाणे परिसरातील गोविंदा पथकांच्या वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांच्या वाहनांकरिता मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवात गेल्या काही वर्षांपासून झगमगाट सुरू झाला असून उंच-उंच थरांसाठी मोठय़ा रकमेची बक्षिसे ठेवण्यावरून आयोजकांमध्ये स्पर्धा रंगू लागली आहे. त्यामुळे या दहीहंडय़ा फोडण्यासाठी मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथक हजेरी लावत असल्यामुळे शहरात वाहतुकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतो. रस्ते अडवून आणि वाहतुकीचा खोळंबा करत साजरा होणाऱ्या या उत्सावांमुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या ठाणेकरांना जीव नकोसा होतो. दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकांचे जथ्थेच्या जथ्थे रस्त्याने पायी जात असल्यामुळे अपघात होण्याची भीती असते. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाच्या दिवशी वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करतात. यंदाही अशाप्रकारे बदल करण्यात आले आहेत. डॉ. मुस चौक, सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. आंबेडकर पुतळा येथून टेंभी नाका चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. गुरुकुल सोसायटी कचराळी तलाव, आराधना क्रॉस, भक्ती मंदिर, ठा.म.पा. चौक येथून ओपन हाऊस चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे. एस.टी. आणि टीएमटीच्या वाहतूक मार्गातही बदल लागू करण्यात आले आहेत. हे वाहतूक बदल सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.

पर्यायी मार्ग.. डॉ. मुस चौक येथून प्रवेशबंदी लागू करण्यात आल्यामुळे या मार्गावरील वाहने डॉ. मुस चौक, गडकरी रंगायतन सर्कल, दगडी शाळा, अल्मेडा चौक मार्गे वळविण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर रोड येथून टिळक चौक नाक्याकडे येणारी वाहने सिव्हिल हॉस्पिटल- कोर्टनाका- जांभळीनाका- बाजारपेठ मार्गे वळविण्यात आली आहे. दगडी शाळेकडून टिळक चौकाकडे जाणारी वाहने अल्मेडा चौक मार्गे जातील. सेंट जॉन स्कूल परिसरातील रहिवाशांची वाहने निर्मलादेवी चौक मार्गे जातील. तसेच गडकरी रंगायतन टॉवर नाका रोड तसेच तलावपाळी बोटिंग क्लब ते गडकरी सर्कलपर्यंत दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच टिळक चौक, टॉवर नाका, डॉ. मूस चौक या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गुरुकुल सोसायटी व कचराळी तलाव येथून येणारी वाहने चंदनवाडी सर्कल-अल्मेडा चौक-नितीन कंपनी मार्गे वळविली आहेत. आराधना क्रॉसकडून येणारी वाहने हरिनिवास सर्कल, तीन हात नाका मार्गे तसेच हरिनिवास सर्कल-तीन पेट्रोल पंप मार्गे वळविली आहे. भक्ती मंदिर येथून येणारी वाहने तीनहात नाका-हरिनिवास सर्कल मार्गे किंवा हरिनिवास सर्कल-तीन पेट्रोल पंप मार्गे वळवली आहे. ठा.म.पा. चौकातील वाहने नितीन सिग्नल किंवा अल्मेडा चौक मार्गे वळविली आहेत. तीन हात नाका ते कॅडबरी नाका येथून वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने माजिवाडा नाका मार्गे कॅसल मिल-जीपीओ मार्गे जातील. ठामपा चौक-अल्मेडा चौक- ओपन हाऊस-आराधना क्रॉस तसेच भक्ती मंदिर-ओपन हाऊस या रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

बसगाडय़ांना प्रवेश बंद
एस.टी. आणि टीएमटीच्या बसगाडय़ांना ठाणे शहरामधून ठाणे स्थानकाकडे ये-जा करण्यास बंदी घातली असून या बसगाडय़ांची वाहतूक सिडको व कोपरी मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच सॅटीस पूल मार्गे ठाणे स्थानकात येणाऱ्या टीएमटी व एसटी बसगाडय़ांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली असून या बसगाडय़ा ठाणे स्थानक येथून दादा पाटील वाडी-गावदेवी-मुस चौक- गडकरी रंगायतन चौक- दगडी शाळा- अल्मेडा मार्गे किंवा टेलिफोन नाका-हरिनिवास सर्कल-तीन पेट्रोल पंप- वंदना एस.टी स्टॅण्ड मार्गे वळविण्यात आली आहे.