इको टुरिझमला मोठा वाव
नागझिरा व नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्यात सहा वाघ, दहा चांदी अस्वल, दहा बिबटे, रान कुत्रे, हरणांचे कळप, मोर, माकडांच्या टोळ्यांसह शेकडो प्रकारचे वन्य जीव आहेत. याला लागूनच नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव आणि कोका अभयारण्य आहे. या पाचही संरक्षित क्षेत्रांमुळे हा परिसर जैविक विविधतेने संपन्न आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण झाला आहे. नवीन नागझिरा अभयारण्यात पर्यटनासाठी मोठा वाव आहे. वन्य जीवांच्या संवर्धनासाठी वातावरण अत्यंत पोषक असल्याचे आढळून आले.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीव विभागाच्यावतीने रविवारी आयोजित तीन अभयारण्यांच्या भेटीत परतीच्या प्रवासात एका अस्वलाचे दर्शन झाले. या अभयारण्यात वन्यप्राण्यांना पाण्याकरिता भ्रमंती करण्याची गरज पडू नये म्हणून ४० पानवटे तयार करण्यात आले आहेत. परिसरात मोठे १२ तलाव असून ते तुडुंब भरलेले आढळून आले. २३ ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. कोका अभयारण्याला लागून असलेल्या परिसरात ५७ गावे तर नागझिरा व नवीन नागझिरा अभयारण्यांच्या क्षेत्रात ५९ गावे आहेत. गावक ऱ्यांच्या गुरांना चराईसाठी पर्यायी व्यवस्था आहे. हिंस्र प्राण्यांकडून गुरांची शिकार झाल्याच्या किरकोळ घटना घडलेल्या आहेत. कोका अभयारण्य १० हजार हेक्टर तर नवीन नागझिरा अभयारण्य १५ हजार हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे.
सध्या महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे असलेले कोका अभयारण्य वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पूर्वाश्रमीच्या भंडारा व नागपूर वन्यजीव विभागांमधून निर्माण केलेल्या गोंदिया वन्यजीव विभागात या पाचही संरक्षित क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६५६ .३५ चौरस किलोमीटर आहे. या पाचही क्षेत्रांतून पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व कान्हा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग (कॉरिडॉर) आहे.  गोंदिया वन्यजीव विभागाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (वन्यजीव) दिला आहे. मूळ अधिसूचनेत समाविष्ट क्षेत्रामधून नागझिरा अभयारण्याचे .१७ चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यटन संकुलासाठी व कोका अभयारण्याचे २.५०चौरस किलोमीटर संरक्षित वन क्षेत्र कमी करण्यात आले आहे.
अभयारण्यात गस्त घालण्यासाठी ‘जीपीएस’ सिस्टीमचा उपयोग करण्यात येतो. हे एक उपकरण असून ते वनरक्षक व अधिकाऱ्यांजवळ असते. गस्तीचा मार्ग या उपकरणात नोंदविला जातो. जंगलात वाघासह इतर वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅमेरातील नोंदीनुसार वाघ सतत स्थलांतर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘डेंडू’ हा वाघ या अभयारण्यात दाखल झाल्यामुळे ‘राष्ट्रपती’ नावाच्या वाघाने स्थलांतर केल्याची माहिती यावेळी मिळाली.
नवीन नागझिरामध्ये पर्यटनास मोठा वाव आहे. सध्या नागझिरामध्ये तीन फाटकांमधून एका दिवसात ६० वाहनांना परवानगी दिली जाते. गेल्या वर्षी ५३ हजार पर्यटकांनी भेट दिली. या तुलनेत नवेगाव बांधला पर्यटन कमी आहे. तेथे वाघ नाही. केवळ नवेगाव बांध व ईटियाडोह पाहण्यासाठी पर्यटक येतात. नवेगावला पक्षांचे स्थलांतरणही कमी झालेले आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील पाच गावे स्थलांतरित करण्यात आली असून ‘इको सिस्टीम’ फारच चांगली आहे. या दौऱ्यात सहायक वन संरक्षक (वन्यजीव) अशोक खुणे, सहायक वन संरक्षक सी.एस. रेड्डी, नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वन संरक्षक प्रमोद पंचभाई, नवीन नागझिराचे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप गवारे व दादा राऊत, वन विभागाचे जनसंपर्क अधिकारी कमलाकर धामगे सहभागी होते.
विदर्भातील कळसूबाई
नवीन अभयारण्यातील चांदीटिब्बा हे ठिकाण विदर्भातील कळसूबाईचे शिखर आहे. हे समूद्र सपाटीपासून ४९४ मीटर उंच आहे.  वन्यजीव विभागाच्या कक्ष क्रमांक १४६ मधील या शिखराचा ‘फायर स्टेशन’ म्हणून उपयोग करण्यात येत आहे. १८७९ पासूनच हे राखीव जंगल आहे. या परिसरात चोरमारा तलाव, गायमुखी नाला असून याचे एकूण क्षेत्रफळ ४६४ चौरस किलोमीटर आहे. या जंगला पाच ते दहा चांदी अस्वल आहेत, हे या जंगलाचे खास वैशिष्टय़ आहे, असे नवीन नागझिरा अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) अशोक खुणे यांनी सांगितले.
इको टय़ुरिझम वाढेल
कोका अभयारण्यात इको टय़ुरिझम वाढण्याला मोठी संधी आहे. हे अभयारण्य व्हावे म्हणून वाईल्ड वॉच फाऊंडेशनने प्रस्ताव दिला होता. आता वन संवर्धनाच्या योजनेला गती  मिळेल, अशी अपेक्षा भंडारा येथील स्वयंसेवी संस्थेचे नदीम खान ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा