नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारास उमेदवारी अर्ज भरण्याआधीच सुरूवात झाली असली तरी गारपीट व अवकाळी पावसाच्या कोसळलेल्या संकटामुळे ग्रामीण भागात कोणत्याही उमेदवारास नेहमीच्या थाटणीत प्रचार करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपरोक्त मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या भागातील बहुतांश शेती अस्मानी संकटाने उध्वस्त झाली आहे. शेतकरी कोलमडून पडला असताना या परिसरात नेहमीसारखा धुमधडाक्यात प्रचार करण्याचे धाडस कोणताही पक्ष करण्यास धजावणार नाही. काही निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबतीने कोणताही बडेजाव न मिरवता नुकसानग्रस्तांचे सांत्वन करणे यावर ग्रामीण भागातील प्रचाराचा केंद्रबिंदू राहणार आहे. काही पक्षांनी हार-तुऱ्यांना फाटा देऊन तर काहींनी हेलिकॉप्टरसारख्या दिखाऊपणाचा बडेजाव न मिरवता अतिशय साध्या पध्दतीने शांतपणे ग्रामीण भागात प्रचार करण्याचे सुतोवाच केले आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि लगोलग उमेदवार निश्चिती झाल्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु, त्याचा नेहमीप्रमाणे गाजावाजा होणार नाही, याची दक्षता सर्वच राजकीय पक्षांकडून घेतली जात आहे. गेल्या आठवडाभरापासून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागास गारपीट व वादळी पावसाने झोडपून काढले. त्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागा, गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, कपाशी, फळबागा अशी सर्वच पिके भुईसपाट झाली. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. निफाड व सिन्नर तालुक्यात गारपिटीने दोन शेतकऱ्यांचे बळी गेले. पिके नष्ट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला. या भीषण परिस्थितीत ग्रामीण भागात नेहमीप्रमाणे वाजतगाजत प्रचार होणार नाही. किंबहुना तसा प्रचार करण्याचे धाडसच कोणत्याही पक्षाचा उमेदवार करणार नसल्याचे लक्षात येते.
उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघातील नंदुरबारचा अपवाद वगळता सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. याआधी माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवार निश्चिती होत नसल्याने प्रचारास कालावधी फारसा कालावधी मिळत नव्हता. परंतु यंदा बहुतेक जागांवरील उमेदवार आधीच जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्षांना मतदारांपर्यंत पोहोचण्यास पुरेसा कालावधी मिळाला आहे. एरवी, ग्रामपंचायत वा जिल्हा परिषदेची निवडणूक म्हटली तरी, ग्रामीण भागात प्रचाराची धूम काही औरच असते. वाहनांचा भलामोठा ताफा, ध्वनीक्षेपकांचा वापर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फौज असा लवाजमा ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण अधोरेखीत करतो. पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र अपवादाने पहावयास मिळेल. ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीच्या पाश्र्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे स्वरुप बदलविण्यात आल्याचे प्रचाराची धूरा सांभाळणाऱ्या अनेक नेत्यांकडून सांगण्यात आले. बहुतेक उमेदवारांनी आधीच नुकसानग्रस्त भागाचा दौराही केला आहे. पण, हा दौरा करताना मतदारसंघाचा प्राधान्याने विचार केला जात असल्याचे दिसते.

हेलिकॉप्टर वा विमान अथवा मोटारींचा भलामोठा ताफा असा कोणताही बडेजाव न करता स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या छोटय़ा गटाच्या सोबतीने शांततेत प्रचार केला जाणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळणे गरजेचे आहे. हा मुद्दा मांडून त्याचा पाठपुरावा केला जाईल. शेतकरी वर्गाला दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून प्रचाराचे नियोजन आहे.
विजय करंजकर
(जिल्हाप्रमुख, शिवसेना)

आपदग्रस्तांना दिलासा देण्यावर भर
मनसेचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी आधीच सिन्नर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागांची पाहणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाणार आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज वा कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे त्यास विरोध करणार आहे. पक्षाची शहरी व ग्रामीण भागात बुथनिहाय यंत्रणा असून त्यांच्यामार्फत प्रचाराचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
– सचिन ठाकरे
(जिल्हाध्यक्ष, मनसे)

हार-तुऱ्यांना फाटा
काँग्रेस आघाडीतर्फे ग्रामीण भागात प्रचारास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी घेतल्या जाणाऱ्या बैठकींमध्ये हार-तुरे या बाबींना फाटा देण्यात आला आहे. नैसर्गिक संकटाने ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. या स्थितीत प्रचाराचा गाजावाजा न करता साध्या पध्दतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू असून मतदारांसमोर केलेली विकासकामे
मांडली जातील.
अ‍ॅड. रवींद्र पगार, (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)