ठाणे येथील पूर्व (कोपरी) स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर या भागात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ठाणे स्थानकाचा पूर्वेकडील परिसर ते सिद्धार्थनगर परिसरात तीन पेट्रोल पंपप्रमाणे वर्तुळाकार पद्धतीने वाहतूक वळविण्यात आली आहे. हा वाहतूक बदल नागरिकांसाठी सोयीस्कर ठरू शकतो का, याची चाचपणी वाहतूक पोलीस करीत असून त्यानंतरच हा बदल कायमस्वरूपी ठेवायचा की नाही, याविषयीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरातून दररोज २५० खासगी बसगाडय़ा धावतात. ठाणे पश्चिम स्थानक परिसरात रिक्षा तसेच सॅटीस पुलावर ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेससाठी थांबा देण्यात आला आहे. खासगी बसगाडय़ांसाठी थांबा उपलब्ध नसल्यामुळे या सर्व बसगाडय़ा पूर्व स्थानक परिसरात उभ्या राहू लागल्या आहेत. यामध्ये कंपन्या तसेच गृहसंकुलांच्या बसेसचा समावेश आहे. याशिवाय ठाणे परिवहन सेवा आणि बेस्टच्या ५० हून अधिक बसगाडय़ा या भागातून प्रवाशांची वाहतूक करतात. दुचाकी, कार तसेच अन्य खासगी वाहनेही मोठय़ा प्रमाणात या भागातून प्रवास करतात. त्यामुळे सिद्धार्थनगर ते कोपरी स्थानक परिसरात मोठी वाहतूक कोंडी होऊ लागल्याचे चित्र आहे. याच पार्श्र्वभूमीवर तीन पेट्रोल पंपपाठोपाठ या भागातही वर्तुळाकार पद्धतीने वाहतुकीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोपरी पूल येथून स्थानक परिसराकडे येणाऱ्या मार्गावर सिद्धार्थनगर येथून स्थानक परिसरापर्यंतचा मार्ग एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानक परिसरातील वाहने आनंद टॉकीजच्या शेजारी असलेल्या मार्गावरून वळण घेऊन सिद्धार्थनगर मार्गे पुलाकडे जातील. असा सुमारे १७० मीटर परिसरात वर्तुळाकार पद्धतीने बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली. हा वाहतूक बदल नागरिकांसाठी सोयीस्कर ठरू शकेल का, याची चाचपणी करण्यासाठी ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोपरी येथील कपडा बाजारमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत असल्यामुळे या ठिकाणी कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Story img Loader