ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या तीन हात नाका तसेच नितीन कंपनी या दोन्ही मुख्य जंक्शनवरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या हेतूने येथील सिग्नल यंत्रणेत मोठे बदल करण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू आहे. या दोन्ही सिग्नल यंत्रणेवर वाहनचालकांचा कमी वेळ खर्ची व्हावा, या दृष्टिकोनातून नियोजन आखण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. याशिवाय शहरातील क्रीकनाका, सिव्हिल हॉस्पिटल, बाळकुम, घोडबंदर रोड आदी परिसरात नऊ ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक पोलिसांनी दिला असून त्यासंबंधी महापालिका सविस्तर अभ्यास करीत आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांत मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून त्या ठिकाणी नागरिकही मोठय़ा संख्येने राहण्यास आले आहेत. शहरातील वाढत्या नागरीकरणाबरोबरच दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ होऊ लागली आहे. शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे वाढत्या वाहनांच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. परिणामी, शहरातील रस्त्यांसह चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी नाका हे तिन्ही जंक्शन शहरातील अंतर्गत रस्त्यांना जोडलेले असून या तिन्ही जंक्शनवर वाहनांची मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे तिन्ही जंक्शन वाहतुकीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येते. मध्यंतरी, या जंक्शनवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव आणि तत्कालीन पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी या दोघांनी एकत्रिपणे नितीन कंपनी येथील जंक्शनवर वर्तुळाकार (रोटरी) पद्घतीने वाहतूक सुरू करण्याचा प्रयोग केला होता. मात्र, एकाच वेळी चारही बाजूने वाहतूक सुरू झाल्याने जंक्शनवर मोठी कोंडी झाल्याने हा प्रयोग अपयशी ठरला होता. तसेच ऐन सकाळच्या वेळेत हा प्रयोग केल्याने दोन्ही विभागांना नागरिकांच्या रोषालाही समोरे जावे लागले होते. तेव्हापासून येथील सिग्नल यंत्रणा बंद आहे.
तीन हात नाका जंक्शन येथील सिग्नल तीन मिनिटे तर कॅडबरीनाका येथील सिग्नल दोन मिनिटांचा आहे. त्यामुळे सिग्नल सुटेपर्यंत वाहनचालकांना वाट पाहत उभे राहावे लागते. परिणामी, सिग्नलजवळील रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर या सिग्नल यंत्रणेत बदल करून येथील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने विचार सुरू केला आहे. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या तीन हात नाका आणि नितीन कंपनी या दोन्ही जंक्शनवरील सिग्नल यंत्रणेत प्रायोगिक तत्त्वावर मोठे बदल करण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू आहे. सिग्नल यंत्रणेत कशा प्रकारे बदल केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि वाहनचालकांचा वेळ वाचेल, यासंबंधीचा अभ्यास महापालिका करीत आहे. या वृत्तास महापालिकेचे नगर अभियंता के.डी. लाला यांनी दुजोरा दिला आहे.

नवीन सिग्नलचा प्रस्ताव..
ठाणे शहरातील क्रीकनाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळील कामगार चौकात (डबल सिग्नल), कापूरबावडी सर्कल, बाळकुम नाका, घोडबंदर रोडवरील विजय गार्डन जंक्शन, लोक हॉस्पिटल -पवारनगर, ओवळा क्रॉस, शिवाजी चौक-कळवा, टी-जंक्शन-पारसिकनाका (बायपास व जुना रोड) अशा नऊ ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक पोलिसांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी महापालिकेस दिला आहे. तसेच ठाणे भिवंडी बायपास रोडवर हायवेवरून बाळकुम व साकेतकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गाचे दोन्ही ठिकाणी अपघात टाळण्यासाठी ब्लिंकर्स बसविण्याचा प्रस्तावही वाहतूक शाखेने दिला आहे. त्यासंबंधी महापालिका अभ्यास करीत असून गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीतही याविषयी चर्चा झाली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Story img Loader