शाहरूख खान, काजोल, राणी मुखर्जी अशी नावे डोळ्यासमोर आली की बॅनर ‘यशराज’च असणार असा पहिला विचार मनात येतो. आता यांची जागा कतरिना कै फ, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रासारख्या नवीन मंडळींनी घेतली आहे. आजही जेव्हा सलमान किंवा आमिरला यशराजकडून आपल्या चित्रपटासाठी करारबध्द केले जाते तेव्हा त्याची चर्चा होते. ठरावीक कलाकार, श्रीमंती वातावरण, त्या वर्गाला अनुरूप असे विषय, प्रेमकथा ही आजवरची यशराजच्या चित्रपटांची पठडी होती. आता मात्र, यशराजमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे शेखर कपूरचा ‘पानी’ हा चित्रपट, आगामी चित्रपटासाठी सोनम कपूर, आयुषमान खुरानासारख्या कलाकारांची निवड अशा वेगळ्या वाटेने यशराजची पावले पडू लागली आहेत.
‘यशराज’चे कर्तेकरविते ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचे निधन झाल्यानंतर आदित्य चोप्राने बॅनरची पूर्ण सूत्रे हातात घेतली आहेत. आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेताना यशराजच्या चित्रपटांमध्येही काळानुसार बदल व्हावेत, अशी आदित्यची इच्छा आहे. आणि त्यासाठी पूर्ण विचाराने जाणीवपूर्वक काही बदल बॅनरच्या आगामी चित्रपटांमध्ये केले जात आहेत. त्याची एक झलक याआधी ‘इश्कजादें’च्या निमित्ताने दिसली होती. पूर्णत: उत्तरप्रदेशातील पाश्र्वभूमीवर ही प्रेमकथा घडवण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शनही हबीब फै जलसारख्या नवीन दिग्दर्शकाने केले होते. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून अगदी हटके चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक शेखर कपूरबरोबर यशराजने आपले सूत जुळवले आहे.
शेखर कपूरचा ‘पानी’ हा चित्रपट यशराज बॅनरखाली तयार होणार आहे. शेखर कपूरचे चित्रपट आणि यशराजचे चित्रपट यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तरीही यशराजने पुढे जाण्यासाठी या चित्रपटाचा आधार घेतला आहे. त्याचबरोबर आपल्या आगामी चित्रपटासाठी यशराजने सोनम क पूर आणि ‘विकी डोनर’ फेम आयुषमान खुराना सारख्या कलाकारांची निवड केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा यशराजच्या चित्रपटांमध्ये घडणार आहे. सोनम आणि आयुषमान दोघेही यशराजबरोबर पहिल्यांदाच काम करत आहेत. शिवाय, या चित्रपटाचे दिग्दर्शन नुपूर अस्थाना करणार आहे. नुपूर अस्थाना नवोदित दिग्दर्शक आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुपूरच्या निमित्ताने यशराजने पहिल्यांदा आपल्या चित्रपट दिग्दर्शनाची धुरा एका महिलेकडे दिली आहे. या चित्रपटाचे लेखन हबीब फैजलनेच केले असून दिल्लीतील बदलत्या जीवनशैलीचा वेध घेणारी ही कथा आहे. हाही विषय यशराजसाठी नवा आहे. नविन वर्षांत नवोदितांना आणि गुणवंतांना यशराजची कवाडे खुली झाली आहेत.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा