बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादीत उद्भवलेला अंतर्गत संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी फुटला, पण त्याला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या गटाच्या बहिष्काराची किनार होती. राष्ट्रवादीच्या महापालिकेतील गटनेतेपदी सुनील काळे, शहर अध्यक्षपदी नितीन हिवसे, तर कार्याध्यक्षपदी चंद्रशेखर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी प्रचार सभेत जाहीर केले खरे, पण खोडके गट अजूनही नवनीत राणा यांना विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
येथील दसरा मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराची सभा सुरू असताना माजी आमदार सुलभा खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौकातील जनसंपर्क कार्यालयात वर्दळ वाढली होती. संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना असलेला विरोध उघडपणे व्यक्त केला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे १९ नगरसेवक आहेत. दोन नगरसेवक वगळता अन्य कुणीही नगरसेवक प्रचार सभेला उपस्थित न राहिल्याने अजित पवार आपली अस्वस्थता लपवू शकले नाहीत. आपल्या भाषणातही त्यांनी नगरसेवकांच्या नाराजीचा विषय काढला. सर्वाच्या मनासारखा उमेदवार मिळत नसतो. त्यामुळे नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने सांगणाऱ्यांचे ऐकू नये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.  यांचा रोख संजय खोडके यांच्या नाराजीकडे होता, पण अजूनही खोडके यांचा गट फुटलेला नाही. हा गट फोडण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या एका गटासह रवी राणा यांनी देखील जोरकसपणे प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचे गटनेतेपद अविनाश मार्डीकर यांच्याकडे आहे. शहर अध्यक्षपदी माजी महापौर किशोर शेळके आहेत. हे दोघेही खोडके यांच्या गटाचे मानले जातात. अविनाश मार्डीकर यांच्या जागी सुनील काळे, तर किशोर शेळके यांच्या जागी नितीन हिवसे यांची नियुक्ती करून राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. या निर्णयामुळे खोडके गटात फाटाफूट होईल, असा होरा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे, पण तूर्तास हा गट अजूनही नवनीत राणा यांच्या विरोधाच्या भूमिकेशी ठाम असल्याचे चित्र आहे. खोडके यांच्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्यावर आजच्या प्रचार सभेदरम्यान कारवाई होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, पण अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा नामोल्लेख किंवा त्यांच्यावर कारवाईचा विषयही छेडला नाही. राष्ट्रवादीचा एक गट खोडके यांच्या विरोधात आहे. हा गट प्रचार सभेत मंचावर वावरत होता, पण नगरसेवकांचा मोठा गट पहिल्याच सभेत प्रचारापासून दूर राहतो, हा सल घेऊनच ही सभा आटोपली. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी सदस्यांच्या सहकार्याने महापालिकेत आघाडी स्थापन केली आहे. स्वतंत्र आघाडी म्हणून त्याची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर थेट कारवाई देखील करता येत नाही, अशी स्थिती आहे. संजय खोडके यांच्यावर तात्काळ कारवाई केल्यास चुकीचा संदेश जाईल आणि निवडणुकीदरम्यान त्याचे पडसाद उमटू शकतील, या शक्यतेने राष्ट्रवादीचे नेते देखील सावधपणे निर्णय घेताना दिसत आहेत. संजय खोडके यांच्या समर्थकांऐवजी अन्य गटाला पदे देऊन नामोहरम करण्याचा वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे, पण खोडके समर्थक नगरसेवकांनी ठाम भूमिका घेतली आहे.