विधानसभा निवडणुकीत शहर आणि जिल्ह्य़ात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले अपयश आणि या पक्षांच्या शहर अध्यक्षांबद्दल कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त होत आहे. या पक्षांतील सामान्य आणि काही ज्येष्ठ कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींकडे शहर अध्यक्ष व कार्यकारिणी बदलण्याची मागणी करू लागले आहेत. दुसरीकडे भाजपला निवडणुकीत यश मिळाले असले तरी शहर अध्यक्ष बदलण्यासंदर्भात आता घडामोडी सुरू झाल्या आहेत. दिवाळी आटोपताच शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी बदलण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शहर आणि जिल्ह्य़ात केवळ एक जागा मिळाल्याने सामान्य कार्यकर्ते पक्षाच्या कामकाजावर नाराज झाले आहे. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीवरून धुसफूस सुरू असताना त्या काळात ती शांत झाली होती. मात्र, पराभवानंतर आता सामान्य कार्यकर्ते पक्षाच्या कामकाज पद्धतीबाबत बोलू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले असले तरी भाजप वगळता उर्वरित तीनही पक्षांना अपेक्षित यश मिळाले नसल्यामुळे त्यामुळे त्यांच्या पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्ष यापुढे जोमाने काम करेल असे सांगितले तरी त्यांच्या विरोधात पक्षाचे काही पदाधिकारी मात्र नाराज असल्याचे दिसून येत आहे. मधल्या काळात पाटील यांच्या विरोधात अनिल अहीरकर, वेदप्रकाश आर्य यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. मात्र, श्रेष्ठींनी पाटील यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना शहर अध्यक्षपदी कायम ठेवले होते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अणि जिल्हा अध्यक्षपद बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काँग्रेसमध्ये हीच परिस्थिती असून शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधात एक गट सक्रिय झाला आहे. ठाकरे स्वत: पश्चिम नागपूरमधून पराभूत झाले. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे नागपुरात आले असता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांनी शहर कार्यकारिणी बदलण्याची मागणी केली आहे. ठाकरे हे मुत्तेमवार यांचे खंद समर्थक आहेत, त्यामुळे अन्य गटांना विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप चतुर्वेदी आणि राऊत गटातील कार्यकत्यार्ंनी केला आहे. भाजपपासून वेगळे झालेल्या शिवसेनेमध्ये जिल्हाध्यक्षाबाबत नाराजी दिसून येत आहे. शेखर सावरबांधे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधेश्याम हटवार यांच्याकडे त्यांनी कार्यभार सोपविला. मात्र, हटवार यांच्याबाबत नाराजी आहे. किरण पांडव यांना दक्षिण नागपुरात उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक नाराज झाले आणि त्यांनी सावरबांधेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्षामध्ये अजूनही असंतोष आहे. तो कुठल्याही क्षणी बाहेर निघू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्यावर असलेली शहराची जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीपूर्वी पक्षात सहभागी झालेले मोहन मते यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे. येत्या दोन महिन्यात भाजपच्या कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता आहे. सावनेरमध्ये उमेदवारांचा झालेल्या घोळामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी राजीनामा दिला होता. दरम्यानच्या काळात डॉ.पोतदार यांच्या विरोधात ग्रामीण भागातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्यामुळे जिल्हाध्यक्षपदावर अनेकांनी दावे केले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा नामंजूर करून त्यांना तूर्तास अभय दिले असले तरी जिल्हाध्यक्षपदाचा वाद पुन्हा उफाळून येऊ शकतो. एकूणच नागपूरचे राजकारण शहर व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या वादामुळे ऐन दिवाळीच्या दिवसात ढवळून निघाले आहे, हे मात्र तितकेच खरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा