जीवनमान उंचावण्यासाठी नागपुरातील लाखो कुटुंबीयांचा रोजचा संघर्ष सुरू असताना गुन्हेगारी टोळ्यांना देशी कट्टा, मोझर गन, सिक्सर गन आणि रायफल अगदी सहजपणे उपलब्ध होत असल्याचे राजा गौस प्रकरणाने उजेडात आले आहे. राजा गौस अली याला उत्तर प्रदेशातून मुसक्या आवळून आणल्यानंतर त्याला न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने शहरात येणाऱ्या देशी कट्टय़ांच्या व्यवहारातील धोकादायक साखळी उलगडण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. राजाने नंदनवन परिसरात पोलिसांवरच गोळीबार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेपासून तो ४० दिवसपर्यंत फरार झाला होता. त्याच्या अटकेने बेकायदेशीर शस्त्रे विकणाऱ्या टोळीचे अत्यंत महत्त्वाचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
रोजच्या जीवनात सामान्य नागरिकाला शिक्षण, रोजगार, व्यवसाय, विवाह, अन्न आणि वाहतुकीसाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु, या धकाधकीत जीवन असुरक्षित झाले असून गुन्हेगारांना मात्र शस्त्रे सहजरित्या उपलब्ध होऊ लागल्याने नागरिक अधिकच असुरक्षित झाला आहे.. गेल्या काही दिवसांमध्ये व्यावसायिक, सामान्य नागरिक आणि जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच हल्ले झाले. यानंतर पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारांची धरपकड चालविली आहे. अटक केलेल्या गुन्हेगारांजवळ आता चाकू-सुरी नव्हे तर थेट देशी कट्टे, रायफली अशी शस्त्रे मिळाल्याने पोलिसही संभ्रमात पडले आहेत. चोहोबाजूंनी झपाटय़ाने विस्तारत चाललेल्या नागपूर शहरात गुन्हेगारीचा आलेखदेखील तेवढाच झपाटय़ाने उंचावू लागला असून स्वयंचलित शस्त्रांचा बाजारही जोरात आहे. काही दिवसांपूर्वी देशी कट्टय़ातून गोळी झाडून उंटखाना परिसरात एका महाविद्यालीय युवकाची अनेकांदेखत हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांवरही गोळीबार झाला. गुन्हेगारांची हिंमत वाढ चालल्याचे आणि त्यांना पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याचेच हे द्योतक आहे.
नागपूर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना स्वयंचलित शस्त्रे एवढय़ा सहजासहजी कशी उपलब्ध होतात, या प्रश्नाचे उत्तर पोलिसांजवळ सध्यातरी नाही. नागपूर जिल्ह्य़ातील खापरखेडा भागात अशी शस्त्रे सहज विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. समाजविघातक प्रवृत्तीचे लोक खापरखेडय़ातून शस्त्रे विकत घेत असल्याचे कटुसत्य पोलिसांनीही मान्य केले आहे. खापरखेडा, सिलेवाडा, वलनी आणि चनकपूर ही गावे देशी कट्टे मिळण्याचे अड्डे झाले आहेत. पोलिसांनी या खेडय़ांवर धाडसत्र राबविल्यास मोठा शस्त्रसाठा त्यांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या भागात देशी कट्टे, सिक्सर गन्स आणि रायफल्स विकली जात आहेत. यामागे बेकायदेशीर शस्त्रविक्रेत्यांची मोठी टोळी असून त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मोठी शोधमोहीम पोलीस दलाला राबवावी लागणार आहे.
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, दरोडे, लुटमार आणि अनेक गंभीर गुन्हे घडलेले आहेत. या गुन्ह्य़ांसाठी देशी कट्टा (एक राऊंड फायर), मोझर गन्स (दहा राऊंड फायर) सिक्सर गन्स (सहा राऊंड फायर) अशा स्वयंचलित शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. गुन्हेगारांच्या वाढत्या प्रस्थामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. खापरखेडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद इक्बाल यांनी अलीकडेच मोठी मोहीम राबविल्यानंतर शस्त्रसाठय़ांचा शोध घेण्यात त्यांना यश मिळाले. खापरखेडा परिसर हा छोटय़ा मोठय़ा उद्योगांसाठी इंडस्ट्री हब म्हणून ओळखला जातो. खापरखेडय़ात औष्णिक वीज केंद्रही आहे. या भागातील राहणारे लोक मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेशातून रोजगाराच्या शोधात आलेले कामगार आहेत. एकतर ते छोटी-मोठी नोकरी किंवा कारखानदारी करतात. सिलेवाडा, चांकपूर, वलनी आणि भानेगावात त्यांची घरे आहेत. या भागात गुन्हेगारांचेही वास्तव्य असून बहुतांश गुन्हेगार स्वयंचलित शस्त्रे बाळगून असल्याने हा भाग अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जात आहे. चाकू-सुरी-गुप्ती बाळगण्याचे दिवस आता संपले असून देशी कट्टा, रायफल, गन्स बाळगण्याचा जमाना सुरू झाला आहे.
खापरखेडा पोलीस ठाण्याची हद्द विस्तृत असून अफाट पसरलेल्या वस्त्यांमधील गुन्हेगार हुडकून काढणे पोलिसांसाठी सोपे नाही. एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना दूर अंतरापर्यंत पायपीट करण्याची वेळ येते. याचा फायदा गुन्हेगारी टोळ्या घेत आहेत. लोकांनी या परिसरात जलद कृती दल तैनात करण्याची मागणी केली असली तरी मागण्यांची फाईल धूळखात पडली आहे. तीन वर्षांपूर्वी २६ जून २०१० रोजी अन्वर नावाच्या गुन्हेगाराचा निर्घृण खून झाल्यानंतर वलनी, चांकपूर, सिलेवाडा हे भाग चर्चेत आले. यानंतर गंभीर गुन्ह्य़ांची मालिकाच या भागात घडत गेली. पोलिसांनी खापरखेडा विद्युत केंद्रातील कामगारांकडून खंडणी वसुली करण्याच्या आरोपाखाली राजू सूर्यवंशी आणि राजकुमार डोमके या दोन गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांच्याजवळ देशी कट्टा आणि मोझर गन आढळली होती. एप्रिल महिन्यात राजा गौस पोलिसांवर गोळीबार करून फरार झाला होता. त्यामुळे नागपुरात आयात होत असलेल्या शस्त्रांकडे पोलिसांचे लक्ष वळले आहे. ही शस्त्रे नेमकी कुठून येतात, याची चौकशी केली जात आहे. बेरोजगार युवकांना दिशाभूल करून गुन्हेगारीच्या मार्गाला लावणाऱ्या टोळ्यांचीही संख्या कमी नाही. या भागातील एका हॉटेलात शस्त्रांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याकडे लक्ष केंद्रित केल्याची पोलीस खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्त के.के. पाठक यांच्या मार्गदर्शनात सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, गुन्हे शाखेचे मुख्य उपायुक्त सुनील कोल्हे, पोलीस निरीक्षक माधव गिरी, महल्ले, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोटे, हवालदार मनोज जोशी, विनोद यादव, सूर्यकांत सांबारे, सुभाष मिश्रा व पप्पू शुक्ला यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे राजा गौस टोळीची अनेक कृष्णकृत्ये उजेडात येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा