गोंदिया जिल्हा परिषदेत २८ जानेवारीला झालेल्या चार सभापतीपदाच्या निवडणुकीवरून भाजपत असंतोष उफाळून आला आहे. या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, असा आरोप करून भाजपच्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी वरिष्ठ पदाधिकांऱ्यावर चांगलीच नाराजी व्यक्त केली.
एवढेच नव्हे, तर निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीही त्याचे पडसाद दिसून आले. गोंदिया तालुक्यातील प्रतिनिधित्वाकरिता अर्थ व बांधकाम सभापतीपदावर डोळा ठेवून असलेले जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर यांनी पक्षाच्या जिल्हा सचिवपदाचा, तर जिल्हा परिषद सदस्य सीता रहांगडाले यांनी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्याकडे पाठविला आहे.
रहांगडाले यांनी आपल्या राजीनाम्यात पदाची जबाबदारी सांभाळण्यात अपयशी ठरत असल्याचे कारण नमूद केले असले तरी या राजीनाम्यात सभापती न मिळाल्याची खंत स्पष्टपणे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सभापतीपदावर तुमची वर्णी लागेल, असे आश्वासन अडीच वर्षांपूर्वी भाजपच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षातील या सदस्यांना दिले होते.
यानुसार इच्छुक व आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल, या आशेवर भाजपच्या जवळपास ८ ते ९ जिल्हा परिषद सदस्यांनी पदासाठी पक्षातील वरिष्ठांकडे साकडे घातले होते, परंतु सर्वच सदस्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नाही, असे सांगून पक्षश्रेष्ठींनी काही सदस्यांना पुन्हा आश्वासन देऊन समजावण्याचा प्रयत्न केला.
या नाराज सदस्यांनी सभापतीपदासाठी सहा जणांनी पक्षाच्या आदेशाला न जुमानता अर्जही दाखल केले, पण नंतर ते मागे घेऊन पक्षातील उमेदवारांना पािठबा दिला, परंतु निवडणुकीनंतर त्या नाराज सदस्यांनी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात पक्षातील आमदार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर चांगलाच रोष व्यक्त केला.
जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या सचिवपदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे पाठविला. एवढेच नव्हे, तर चतुर यांनी छावा व ओबीसी संग्राम परिषदेच्या जिल्हा सचिवपदाचा राजीनामाही संस्थापक अध्यक्ष आमदार नाना पटोले यांना पाठविला आहे.
एकंदरीत भाजपमध्ये गेल्या चार दिवसांपासून अंतर्गत युद्ध सुरू झाले आहे. यामुळे गटबाजीतून पुन्हा एक नवीन गट तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. याच निवडणुकीच्या एका वादातून माजी आमदारांच्या मुलाने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांना सभागृहाबाहेर केलेल्या शिवीगाळीवरूनही भाजपमधील शिस्त व शिष्टाचारावर जिल्ह्य़ात चर्चा सुरू आहे.

Story img Loader