वर्षभरात नियोजन समितीची बठक न झाल्याने २०० कोटींची कामे दोन महिन्यांत मार्गी लावून योग्य पद्धतीने निधी खर्चायचा आहे. केवळ हंगामा नको. चेहराही बदलला पाहिजे. लोकांची क्षमता वाढवली तर समस्या सुटतात, यावर आपला विश्वास आहे. कामातून मी आपला आहे, परका नाही हा विश्वास निर्माण करेल, अशी सडेतोड भूमिका नूतन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी व्यक्त केली.
बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून सुनील केंद्रेकर यांची औरंगाबादला बदली होऊन नवलकिशोर राम यांची येथे नियुक्ती झाली. केंद्रेकर यांनी १६ महिन्यांत पदाचा दरारा निर्माण केला. परिणामी त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्य़ात ‘बंद’ पाळण्यात आला. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी राम यांच्या कार्यपद्धतीची सर्वानाच उत्सुकता आहे. या पाश्र्वभूमीवर राम यांनी सांगितले की, माणसा-माणसांत फरक नको, हा संस्कार लहानपणीच मिळाला. वडील शेतकरी. जन्म बिहारच्या मोतीहारी जिल्हय़ातील. शिक्षणही बिहार, झारखंडच्या गुरूकुल परंपरेतील. इतिहास विषयात उच्च पदवी घेतली. वर्गातील सातही मित्र आएएस आहेत. सन २००७ मध्ये आयपीएसमध्ये निवड झाली. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बिहारमध्ये नियुक्ती मिळाली. याच दरम्यान आयएएसमध्येही निवड झाली. प्रशिक्षणानंतर पहिली नियुक्ती नांदेडला झाली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकर परदेशी यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळाले. याच काळात मराठवाडय़ाची सामाजिक, राजकीय माहिती झाली. दोन वर्षे यवतमाळ जि. प.त काम केल्यानंतर बीडला जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. बीडबद्दल अनेकांनी बरेच काही सांगितले होते. मी आव्हान म्हणून आलो आहे.
दोन दिवसात अनेकांबरोबर बोललो, तेव्हा अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता दिसून येते. लोक यंत्रणेशी गरवर्तन का करतात, हेही तपासले पाहिजे. चोरी करणाऱ्यालाही आपला मुलगा चांगला अधिकारी झाला पाहिजे, असे वाटते. प्रशासनात अनेक त्रुटी आहेत. सुनील केंद्रेकर यांनी शिस्त लावली. विश्वास वाढविला. पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. लोकांनीही तुलनात्मक पाहू नये. मी जिल्हाधिकारी आहे, पोलीस अधीक्षक नाही. लोकांना भेटण्यास देखावा उभा करण्याची गरज नाही. मला हंगामा करायचा नाही, तर विकासाचा चेहरा बदलला पाहिजे असे सांगून मागील वर्षभरात जिल्हा वार्षिक योजनेची बठक झाली नाही. परिणामी निवडणुका लागण्यापूर्वी २०० कोटींची कामे दोन महिन्यांत मार्गी लावून निधी नियमानुसार व योग्य पद्धतीने खर्च करायचा आहे. कोणाकडेही पसा थांबणार नाही. मग गरप्रकारांना आपोआप आळा बसेल, असेही राम यांनी सांगितले.
नवे जिल्हाधिकारी राम यांनी सूत्रे स्वीकारली
वर्षभरात नियोजन समितीची बठक न झाल्याने २०० कोटींची कामे दोन महिन्यांत मार्गी लावून योग्य पद्धतीने निधी खर्चायचा आहे. केवळ हंगामा नको. चेहराही बदलला पाहिजे. लोकांची क्षमता वाढवली तर समस्या सुटतात, यावर आपला विश्वास आहे.
First published on: 05-12-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charge accept to new collector ram