कोटय़वधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी अटकेतील मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडच्या तीन संचालकांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने चार हजार पानांचे आरोपपत्र बुधवारी न्यायालयात सादर केले. मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने जास्त व्याज / परताव्याचे आमिष देऊन हजारो लोकांकडून कोटय़वधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. मुदत संपल्यावरही ही रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार साशंक झाले. आर्किटेक्ट विवेक अशोक पाठक (रा. लक्ष्मीनगर) यांच्याकडून २ कोटी ७४ लाख ३६ हजार रुपये स्वीकारले, मात्र ते परत दिले नसल्याची तक्रार त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या तक्रारीप्रकरणी प्रशांत जयदेव वासनकर, विनय जयदेव वासनकर, भाग्यश्री वासनकर, अभिजित जयंत चौधरी, कुमुद चौधरी, मैथिली विनय वासनकर हे संचालक तर चंद्रकांत राय, देवदत्त कर्दळे व खापरे हे कर्मचारी आदी नऊ आरोपींविरुद्ध ९ मे रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्याचे कलम तीन व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. प्रशांत जयदेव वासनकर (रा. श्रीनाथार्पण, कॉसमॉस टाऊन जयताळा रोड), विनय जयदेव वासनकर (रा. मेरीगोल्ड अपार्टमेंट लक्ष्मीनगर) व अभिजित जयंत चौधरी (रा. प्रसादनगर जयताळा) या तीन संचालकांना २७ जुलैला त्यांच्या घरून अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिल रोड, शिवाजीनगर धरमपेठस्थित कंपनीचे कार्यालय तसेच घर आदींसह अनेक ठिकाणी झडती घेऊन बँक व्यवहार पुस्तके, रोख पुस्तके, पावती पुस्तके, ताळेबंद, गुंतवणूक आदी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे आज या आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात चार हजार पानांचे आरोपपत्र सादर केले. या तीन आरोपींनी ८० कोटी ५७ लाख रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा