भूसंपादनाला विखे यांचा विरोध
एमआयडीसीच्या जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ताच्या ग्रामस्थांनी संघटित होऊन पिटाळून लावावे, अंगावरुन गाडय़ा घातल्या तरी सर्वेक्षण होऊ न देण्याची भूमिका घ्यावी, विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे आणा, उच्च न्यायालयात जा, असे आवाहन माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी आज केले.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जमीन संपादनाच्या विरोधासाठी विखे यांची भेट घेतली, तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी श्ष्टिमंडळास हा सल्ला दिला. जमीन संपादनासाठी लोकांना नोटीसा बजावल्या आहेत, त्यावर उद्याच (शुक्रवार) प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी दिली.
संपादनासाठी मागितलेली जमीन लागवडीखालील आहे, नगर तालुक्यातील इतर कोणत्याही गावापेक्षा तेथे अधिक चांगली पिके उभी आहेत, बागायती क्षेत्रही आहे, संपादनासाठी विरोध असतानाही सरकारने जबरदस्तीने सात-बारावर इतर हक्कात नाव लावल्याचे शिक्के मारले आहेत, याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. जमीन संपादनाचा अंतिम निर्णय झाला नसताना असे शिक्के कसे मारले जातात, असा आक्षेप घेऊन विखे म्हणाले, शिक्के मारल्याने सध्या शेतकऱ्यांचे व्यवहार थांबले आहेत, त्यांना कोणी कर्ज देत नाही, नापिक व पडिक जमीन घेण्याचे धोरण असताना, सरकारच्या विरोधात जाऊन बागायती जमीन कशा संपादित केल्या जातात, याविरोधात लोकांनी संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी लोकांना संघटित करुन मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.    

Story img Loader