जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी व त्यांच्या कार्यातून समाज प्रबोधन व्हावे, या हेतूने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उद्या, १७ ते २४ फेब्रुवारीदरम्यान छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजन समितीचे डॉ. दिलीप महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा महोत्सव आझाद मदान परिसरात उभारलेल्या मंडपात होणार आहे. रविवार, १७ फेब्रुवारीला सकाळी शिव मॅरेथॉन स्पध्रेने या महोत्वाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर महात्मा फुले चौकात रांगोळी स्पर्धा घेण्यात येईल. याच दिवशी सकाळी ११ वाजता शिवाजी चषक कराटे स्पर्धा व दुपारी १२ वाजता  शिवचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २.३० वाजता वैचारिक प्रबोधनासाठी परिसंवाद होत असून ‘युवकांचा राजकारणातील सहभाग‘ या विषयावर भास्कर इथापे, इम्तीयाज पिरजादे हे शिवराज्य पक्षाचे पदाधिकारी विचार मांडणार आहेत. सायंकाळी महोत्सवाचे उदघाटन नगराध्यक्ष योगेश गढीया यांच्या हस्ते होणार आहे.
या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रदीप वादाफळे आहेत. सायंकाळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम होत असून यावेळी आयकर आयुक्त अमित बोबडे, सहायक प्रकल्प अधिकारी अर्जुन मेहत्रे व प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बारकावे सांगणार आहेत. त्यानंतर युवा कॅण्डल लाईटींग शो, समूहगान, समूह नृत्याचेही कार्यक्रम घेण्यात येतील. यानंतर पाच व्यक्तींना छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्कार देण्यात येईल. सोमवारी सायंकाळी विविध महापुरुषांवर वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता ‘जिजाऊ-शिवरायांच्या विचार क्रांतीनेच स्त्री अत्याचारास प्रतिबंध‘ या विषयावर औरंगाबाद येथील अ‍ॅड. वैशाली डोळस यांचे व्याख्यान होईल. या व्याख्यानादरम्यान पाच महिलांना जिजाऊ पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. मंगळवारी दुपारी शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर अभियंता भाऊ थुटे यांच्या सप्तखंजेरी वादनाचा कार्यक्रम व त्यानंतर पाच शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
बुधवार ‘धर्मनिरपेक्ष बहुजनोध्दारक छत्रपती शिवराय ते छत्रपती शाहू यांची कृषी व आरक्षण नीती’ या विषयावर विचारवंत गंगाधर बनबरे यांचे दुसरे जाहीर व्याख्यान होईल.
यावेळी पाच व्यक्तींना छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर औरंगाबाद येथील प्रगत प्रदीप साळुंके यांचे तिसरे जाहीर व्याख्यान होईल.
शुक्रवारी विनामूल्य नेत्र शस्त्रक्रिया शिबीर, शनिवारी, २३ ला गाडगे महाराज जयंती समारोह निमित्त संदीपाल महाराजांचे कीर्तन व २४ फेबुवारीला पारधी समाज बांधवांची वैद्यकीय तपासणी व कपडय़ांचे वाटप करण्यात येईल.

Story img Loader