भारतात सर्वच पातळ्यांवर विसंगत वर्तन-व्यवहार आढळतो. आपल्या उक्ती व कृतीतली विसंगती कमी होत नाही, तोवर भारत कदापि महासत्ता होणार नाही. कार्यसंस्कृती सुधारल्याशिवाय महासत्ता हे केवळ स्वप्नरंजनच ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने बी. रघुनाथ सभागृहात आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ‘जगाच्या पाश्र्वभूमीवर भारत’ या विषयावर लवटे यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानमालेचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षांचे पहिले पुष्प लवटे यांनी गुंफले. प्रत्येक विकसित देशाला त्याची कार्यसंस्कृती पुढे घेऊन जात असते. जपानसारख्या देशाने आपल्या कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून जगभरात स्वतची ओळख निर्माण केली. आपण मात्र कोणतीही कार्यसंस्कृती अजून रुजवू शकलो नाही. मूलभूत अर्थशास्त्र विकसित करू शकलो नाही. आपण पाणीही मस्तवाल पद्धतीने वापरतो. काही भागात पाण्याबद्दल बेपर्वाई, तर काही भागात मोठय़ा प्रमाणात अवर्षण अशी विसंगती आपल्याकडे आढळून येते. जगात असंतुलित विकास हा अपराध मानला जातो; पण आपल्याला त्याचे काहीही वाटत नाही.
देशाच्या विकासासंबंधी मूलभूत विचार आपण अजूनही केला नाही. जगात जे काही बदल झाले, ते जागरूक नागरिकांनी केले आहेत. भारताचा मध्यम वर्ग हा या बाबतीत सगळ्यात मोठा शत्रू आहे. मध्यमवर्गीयांनी जगात परिवर्तने केली. बदलाची सुरुवात प्रत्येक वेळी याच वर्गातून होते. मात्र, अलीकडे हा बदल कमालीचा बेफिकीर झाला आहे. गेल्या काही वर्षांत नव श्रीमंतांमुळेच आपल्या देशात बाबांचे प्रस्थ वाढले आहे, असे लवटे म्हणाले. त्यांनी भाषणात युरोप, चीन, जपान, सिंगापूर येथील उदाहरणे दिली.
विलास पानखडे यांनी प्रास्ताविक केले. लवटे यांचा परिचय इंद्रजित भालेराव यांनी करून दिला. प्रा. भीमराव खाडे यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास टेंगसे यांनी आभार मानले.

Story img Loader