खासदार अथवा आमदार निधीतून कुठेही विकासकाम झाले की त्याचा गवगवा करण्यासाठी ते काम कोणी केले याचा फलक उभारणे ओघाने आलेच. अर्थात या कामासाठी निधी मिळविण्याकरिता शासनाकडे संबंधितांनी पाठपुरावा केला असल्यामुळे त्यावर कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि सर्वस्वीपणे शासनाकडून केल्या जाणाऱ्या कामाचे असे श्रेय घेण्याची धडपड सुरू झाल्यास मग सर्वत्र फलकांची जत्राच भरेल. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर पालकमंत्री छगन भुजबळ आणि खा. समीर भुजबळ यांच्या नावाने झळकणाऱ्या अशाच स्वरूपाच्या फलकांचे पांथस्थांना आधीच कोडे पडले असताना, आता या फलकांच्या संख्येत दिवसागणिकभर पडू लागल्याने वारकरी संभ्रमात पडले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर या ३० किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर असताना या ठिकाणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने ‘दूरदृष्टी व नियोजन’चा अनोखा प्रकार सुरू असल्याकडे ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला होता. वास्तविक राज्यात कोणत्याही महामार्गाचे विस्तारीकरण, नूतनीकरण वा नव्या रस्त्याचे काम सुरू करताना ठेकेदाराकरवी सार्वजनिक बांधकाम विभाग त्या कामाचे स्वरूप, काम कधी सुरू झाले व कधी पूर्ण होणार याची मुदत, त्यावर होणारा खर्च आदी माहितीचा फलक उभारत असतो. परंतु, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर या फलकाऐवजी ‘सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री यांची दूरदृष्टी व नियोजनातून व खा. समीर भुजबळ यांच्या प्रयत्नातून सिंहस्थांतर्गत चौपदरीकरण व पालखी मार्गाचे ४८० लक्ष रुपयांचे काम प्रगतिपथावर’ असे फलक उभारले गेल्याने वाहनधारक आधीच बुचकळ्यात पडले असताना निवृत्तीनाथ यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांची देखील तीच स्थिती झाली आहे.
नागरिकांकडून कर स्वरूपात जमा होणारी रक्कम शासन विकासकामांसाठी खर्च करीत असते. त्याच निधीतून हे काम होत असताना आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून रस्त्याची कामे करणे ही त्या मंत्र्यांची जबाबदारी असताना असे फलक लावणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला होता. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोच निवृत्तीनाथ यात्रेसाठी त्र्यंबकमध्ये लाखो वारकरी येणार हे लक्षात घेऊन पुन्हा नव्याने काही फलक आधीच्या फलकांच्या शेजारीच उभारले गेले आहेत. प्रस्तावित विस्तारीकरणात पालखी मार्गाचाही समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रथमच पालखी मार्गाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद’ असा फलक उभारण्यात आला असून, त्यावर पालकमंत्री व खासदार यांचे छायाचित्र आहे. हा फलक कोणी उभारला हे कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. पालखी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना श्रेय लाटण्यासाठी आतापासूनच धडपड सुरू झाल्याची पांथस्थांची भावना आहे. या फलकांशी आपला कोणताही संबंध नसल्याची भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असली, तरी महामार्गावर अनधिकृतपणे लागणाऱ्या फलकांवर कारवाई करण्यासही त्यांनी हात आखडता घेतल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा