ग्रामसभा न घेताच बनावट पाणलोट समिती स्थापन करून त्या आधारे घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथे ३३ लाख २८ हजार रुपयांची कामे झाल्याचे दाखवून अपहार केल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करावी, असा आदेश घनसावंगीचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी विकास बडे यांनी दिला.
घनसावंगीचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी व्ही. के. कुळकर्णी, कृषी पर्यवेक्षक एन. सी. तळपे, कृषी सहायक ज्ञानदेव करंडे, ग्रामसेवक प्रवीण घोडके, पाणलोट समिती अध्यक्ष गजानन सोसे व सचिव गंगाधर सोसे यांच्याविरुद्ध फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चित्रवडगावचे कार्यकर्ते विष्णू कदम यांनी वसुंधरा पाणलोट योजनेची कामे गावात होत असताना गैरप्रकार झाल्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिले होते. परंतु काही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात दाद मागितली.
कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २००५ ते २०१० दरम्यान ग्रामपंचायत सदस्य गंगाधर सोसे, तसेच गजानन सोसे हा बनावट ग्रामसभेच्या आधारे निवडलेल्या पाणलोट समितीचा अध्यक्ष होता. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी कुळकर्णी व इतरांनी संगनमताने सरकारच्या पाणलोट विकास निधीत गैरप्रकार केला. तत्कालीन महिला सरपंचाच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेत परस्पर त्यांचे खोटे अंगठे उमटवून बनावट ग्रामसभा दाखविली व पाणलोट समिती तयार केली. समितीतील दोन सदस्यांना आपण समितीवर असल्याची कल्पनाही नव्हती.
सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पाणलोट समितीचा सचिव बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असले, तरी या समितीचा सचिव दहावीपर्यंत शिकला होता. तत्कालीन उपसरपंचानेही बनावट ग्रामसभेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. चित्रवडगाव येथील पाणलोट प्रकल्पांसाठी ९० लाख १५ हजारांचा निधी मंजूर असून, गेल्या ५ डिसेंबपर्यंत यापैकी ३३ लाख १८ हजार रुपये गैरमार्गाने खर्च झाले आहेत. उर्वरित ५६ लाख ७७ हजार निधीचा गैरप्रकार होण्याची शक्यताही कदम यांनी फिर्यादीत व्यक्त केली. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश घनसावंगी पोलिसांना दिले आहेत.

Story img Loader