राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान न देता कराराच्या थकबाकीपोटी पाच हजार रूपये उचल देण्यात आली आहे. हे अन्यायकारक असून देण्यात आलेले पाच हजार सानुग्रह अनुदान समजून कोणतीही कपात न करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष आ. जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांसह परिवहन सेवा कर्माचाऱ्यांना नवीन मुंबईत १२ हजार ८००, कल्याण डोंबिवलीत १० हजार, पिंपरी चिंचवडमध्ये नऊ हजार, पुण्यात सहा हजार, मुंबईमध्ये पाच हजार तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. परंतु एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना काहीही न देता आठ महिन्यापासून करार थकबाकीपोटी केवळ उचल म्हणून पाच हजार रूपये देऊन कामगारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आ. छाजेड यांनी केला आहे.
एसटी महामंडळातील कामगारांचे पगार हे अत्यंत कमी असून महागाई आणि मिळणारा अत्यल्प पगार यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. त्यातच मागील आठ महिन्यापासून करार झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आता कामगारांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.
कामगार करार त्वरीत करण्यात यावा, वेतनात ३० टक्के वाढ करावी, परिवहन कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे श्रेणीनुसार वेतन देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या समान काम समान दाम या न्याय तत्वानुसार कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, किमान वेतन कायद्यानुसार वेतनातील फरक तात्काळ द्यावा, अनुकंप धारकांना नियमित वेतनश्रेणी द्यावी, दिवाळीसाठी म्हणून देण्यात आलेली उचल पाच हजार रूपये सानुग्रह अनुदान समजून कपात करण्यात येऊ नये, मॅक्सीकॅबला  परवानगी देऊ नये, महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, स्वच्छतागृह व नियमानुसार सोयी सवलती द्याव्यात, माजी सैनिक कर्मचाऱ्यांना सैन्य दलातील वेतन संरक्षित करण्यात यावे, आदी मागण्यांकरिता लवकरच महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आ. छाजेड यांनी दिली.

Story img Loader