निवडणूकीच्या काळात उमेदवारांकंडून होणारी दौलतजादा रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने आणि स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. पनवेलमध्ये ४० अधिकाऱ्यांच्या पथकाचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर बारीक नजर आहे. गेल्या आठ दिवसामध्ये या पथकाने मध्यरात्री फिरणाऱ्या १२०० वाहनांची कसून तपासणी केली आहे. या वाहनांच्या तपासणीचे पथकाने चित्रफित तटार माहिती तहसलिदार पवन चांडक यांनी दिली आहे.सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास राजकीय पक्षाचे भिंतीपत्रक चिटकवणारे वाहन निवडणूक आयोग दक्षता पथकाने अडविले. दोन पोलीसांच्या साह्य़ाने या वाहनाची पुर्ण झडती घेण्यात आली. ऐरवी या वाहनांना कोणीही अडवत नाहीत. पोलीसही त्यांच्याकडे कानाडोळा करतात. उगाच अशा गाडय़ा अडविल्यावर राजकीय पक्षांच्या बडय़ा नेत्यांची झोपमोड होते, त्यांना थेट पोलीसांशी फोनवर बोलावे लागते. त्यानंतर त्याच पोलीसाला हसतमुखाने हे वाहन सोडून द्यावे लागते. निवडणूकीच्या काळात आयोगाने दक्षता पथकाला सर्तकतेचा इशारा दिला आहे. कोणतेही वाहन संशयीत वाटल्यास त्याची तपासणी करावी. संबंधित वाहनांमध्ये असणाऱ्या संपत्तीचे विवरण संबंधिताने न दिल्यास आयकर विभागाची मदत घेऊन या संपत्तीची माहिती घ्यावी असे थेट आदेश आयोगाने दिले आहेत. पनवेल परिसरात दिवसभरात होणाऱ्या राजकीय सभांसाठी तीन सर्वेक्षण छायाचित्रीकरणासाठी तीन वेगळी पथके काम करत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राहूल नार्वेकर, शेकापचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे या तीन उमेदवारांच्या हालचालींकडे आयोगाच्या सर्वेक्षण छायाचित्रीकरणाचे पथक सतत लक्ष देऊन आहे. ४० कर्मचारी आणि ९ चित्रीकरणासाठी कॅमेरे या प्रक्रियेत कार्यरत आहेत. पनवेलच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाने भरारी पथक नेमण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी तथा पनवेलचे तहसिलदार पवन चांडक यांनी सामान्य नागरिकांनाही जागृत राहण्याच्या आवाहन केले आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन होत असल्याची माहिती जनतेकडे असल्यास त्यांनी पनवेलसाठीच्या निवडणूक आयोगाच्या ०२२-२७४५२३३३ दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा