माढेळी येथील सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त २८३ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदतीचे धनादेश पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. वरोरा तहसील कार्यालयाने आयोजित या मेळाव्यात खासदार हंसराज अहीर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, उपविभागीय अधिकारी जी.एच. भुगावकर, डॉ. विजय देवतळे, तहसीलदार प्रमोद कदम, सभापती राजेंद्र लडके व डॉ. आसावरी देवतळे उपस्थित होते.
सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी आले असून शासकीय योजनासाठी व अन्य लाभासाठी उपयुक्त असलेली कागदपत्रे बनवून घ्या, सोबतच सातबारा अद्ययावत करून घ्या, असे आवाहन देवतळे यांनी मेळाव्यात केले. जिल्हय़ात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली असून तो पैसा दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, असे देवतळे यांनी सांगितले.
 शेतकऱ्यांनी सातबारा या अभियानात अद्यावत करून घ्यावा जेणे करून मदत मिळण्यास अडचण होणार नाही. माढेळी येथील मेळाव्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदतीचे धनादेश प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ५५० विविध दाखल्यांचे शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सोईट येथील पुनर्वसित जमिनीचे ४७ पट्टे, १३ गावच्या जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर, ११३७ ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे ३०० अर्ज भरून घेतले. ५०० ज्येष्ठ नागरिकांना वयाचे दाखले इत्यादी या शिबिरात वाटप करण्यात आले. कृषी, आरोग्य व समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून दाखले वाटपाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून याव्दारे नागरिकांच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होतील. सरकार जनतेसाठी असते व जनतेने शासकीय योजनांचा फायद्या घ्यावा हे सूत्र या कार्यक्रमातून साकारताना दिसते, असेही अहीर यांनी सांगितले.
डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हय़ात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थिताना माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद कदम यांनी केले. या कार्यक्रमाला माढेळी परिसरातील हजारो नागरिक, महिला तथा विद्यार्थी उपस्थित होते. ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे १७१ दाखल्याचे वाटप करण्यात आले. तहसीलदार आशीष वानखेडे, नायब तहसीलदार पांढरे, मंडल अधिकारी गायधने यांच्यासह नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Story img Loader